दरवर्षीच्या जुलै महिन्यात होणारी टूर द फ्रान्स ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक सायकलप्रेमीसाठी पर्वणीच असते. अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्राँगच्या उत्तेजक प्रकरणाचं गोलबोट लागूनही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.

आल्प्स पर्वतराजीमधील खडतर परंतु विलोभनीय डोंगराळ मार्ग, सूर्यफुलांच्या झुडपांमधून जाणारे रस्ते व सागरकिनाऱ्याला स्पर्श करीत जाणारा मार्ग अशा नयनरम्य मार्ग लाभलेली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत ही जगातील सर्वोच्च प्रतिष्ठेची शर्यत आहे. या शर्यतीमध्ये भाग घेणे हे परदेशातील प्रत्येक सायकलपटूचे स्वप्न असते. तीन आठवडे चालणाऱ्या या शर्यतीत प्रत्येक सायकलपटूच्या जिद्दी, शारीरिक व मानसिक क्षमता, संयम, चिकाटी व सायकलिंग कौशल्य आदी गोष्टींची कसोटीच असते.
साधारणपणे मे महिना संपत आला की आंतरराष्ट्रीय सायकलपटूंना वेध लागतात ते फ्रान्समधील या अद्वितीय आनंद देणाऱ्या शर्यतीचेच. साडेतीन हजार किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत तीन आठवडय़ांमध्ये खेळाडूंना विविध वातावरणाच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कधी मुसळधार पाऊस तर कधी कडक उन्हामुळे अंगाची होणारी लाहीलाही, कधी आल्प्स पर्वतराजीमधील टप्प्यात होणारी बर्फवृष्टी असे बदलते वातावरण या शर्यतीमधील खेळाडूंपुढे प्रत्येक वेळी वेगवेगळे आव्हान निर्माण करीत असते. त्याचबरोबर कधी खडी चढण तर कधी खूप उतार, कधी धोकादायक वळणे, जंगलामधील खडतर रस्ते, नाकासमोरील उभी चढाई अशा प्रतिकूल रस्त्यांवर सायकल चालविणे म्हणजे असामान्य सायकलपटूंकरिताच ठेवलेला मार्ग आहे असेच वाटते. त्यामुळेच की काय जगातील सर्वोत्तम सायकलपटूंनाही येथील प्रत्येक टप्प्यात झगडावे लागते. कितीही खडतर कसोटी पाहणारी ही शर्यत असली तरी १९०३ पासून ही शर्यत म्हणजे जागतिक सायकलिंग मालिकेतील अनिवार्य शर्यतच झाली आहे. दोन महायुद्धांचा कालखंड वगळता ही शर्यत दरवर्षी नियमितपणे जुलै महिन्यातच आयोजित केली जाते.
या रंजक शर्यतीचा इतिहासही तितकाच रंजक आहे. ही शर्यत सुरू करण्याचे श्रेय एका मासिकास द्यावे लागेल. एल ऑटो या क्रीडाविषयक मासिकाच्या प्रसारासाठी मासिकाच्या जिओ लेफेव्हरी या मुख्य सायकलिंग वार्ताहराने अभिनव कल्पना शोधून काढली. जिओ हा या मासिकात रुजू झाला, त्या वेळी हे मासिक आर्थिक अडचणीत व अन्य मासिकांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डबघाईस आले होते. त्या वेळी फ्रान्समध्ये लांब अंतराच्या व सहा-सात दिवसांच्या सायकल शर्यती खूप लोकप्रिय होत्या. जिओ याने मासिकाच्या प्रसारासाठी अशी शर्यती आयोजित कराव्यात असा प्रस्ताव मांडला. त्याच्या सुदैवाने या मासिकाचे संपादक हेन्री डेसग्रेंज हे सायकलिंगचे खूप चाहते होते. त्यांनी ही संकल्पना उचलून धरली. मासिकाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना ही कल्पना फारशी रुचली नाही. तथापि मासिकाचे आर्थिक संचालक व्हिक्टर गॉडेस्ट यांनी या कल्पनेस होकार दिला. त्यांनी चक्क तिजोरीच्या चाव्याच डेसग्रेंज यांच्याकडे सुपूर्द केल्या. १९ जानेवारी १९०३ रोजी पहिली टूर डी फ्रान्स शर्यत घेण्यात आली. त्यानंतर अव्याहतपणे या शर्यतीचा प्रवास सुरूच आहे. हळूहळू या शर्यतीच्या लोकप्रियतेची सीमा फक्त फ्रान्सपुरतीच राहिली नाही. जगातील अनेक देशांमधील खेळाडू या शर्यतीत भाग घेऊ लागले. १९३०च्या शर्यतीत डेसग्रेंज यांनी खेळाडूंना त्यांच्या प्रायोजक कंपनीऐवजी आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा सल्ला दिला. शर्यतीद्वारे विविध देशांमधील संबंध अधिक दृढ व्हावेत हाच त्यामागे हेतू होता. मात्र त्यामुळे खर्चाचा बोजा संयोजकांवर पडणार होता. डेसग्रेंज यांनी हा भार उचलण्यासाठी शर्यतीपूर्वी प्रायोजक कंपन्यांची बोधचिन्हे असलेली व खेळाडूंच्या प्रतिकृतींची मिरवणूक घेण्याचे ठरविले. ही संकल्पना प्रायोजकांनी उचलून धरली. १९३० ते १९६० या कालावधीत या शर्यतीच्या मिरवणुकीचेही चाहत्यांमध्ये विलक्षण आकर्षण होते. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कंपन्यांकडून चाहत्यांना टोप्या, चॉकलेट्स, बिल्ले, टी-शर्ट्स आदी विविध वस्तू मोफत दिल्या जातात. या वस्तू मिळविण्याच्या फाजील उत्साहात काही जणांना मृत्यूही झाला आहे. विविध वाहिन्यांद्वारे या शर्यतीचे थेट प्रक्षेपण सुरू झाल्यानंतरही या मिरवणुकीची लोकप्रियता अद्याप टिकली आहे. साधारणपणे अडीचशेहून अधिक वाहने या मिरवणुकीत सहभागी होतात. काही प्रायोजक कंपन्या तीन-चार वाहनांद्वारे आपली प्रसिद्धी करतात. या मिरवणुकीच्या संयोजनासाठी स्वतंत्र समितीच कार्यरत असते. १९४४ पर्यंत एल ऑटो या मासिकाची लोकप्रियता होती मात्र या मासिकाच्या मालकांना अन्य ठिकाणी आलेल्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांनी हे मासिकच बंद केले. मात्र टूर डी फ्रान्स शर्यत थांबलेली नाही. सध्या अमौरी स्पोर्ट्स संघटनेकडे त्याची सूत्रे आहेत. या शर्यतीच्या २१ दिवसांच्या कालावधीत साधारणपणे ४७०० तासांचे थेट प्रक्षेपण विविध वाहिन्यांद्वारे केले जाते व त्याचा आनंद १८८ देशांमधील चाहते घेत असतात. यावरून या शर्यतीच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते.
या शर्यतीमधील प्रत्येक दिवशीच्या टप्प्यातील पहिल्या तीन खेळाडूंना पारितोषिक दिले जाते. प्रत्येक टप्प्यानंतर आघाडीवर असलेल्या खेळाडूला पिवळ्या रंगाचा जर्सी दिला जातो व हा जर्सी घालून सायकलिंग करणे हे या खेळाडूसाठी खूप अभिमानास्पद असते. पर्वतराजीमधील मार्गातील आघाडीवीर, गुणांनुसार आघाडीवीर आदी खेळाडूंना विविध रंगांचे जर्सी दिले जातात. असे वेगवेगळे जर्सी घालून सायकलिंग करण्यासाठी स्पर्धकांमध्ये अहमहमिका लागलेली असते.
टूर डी फ्रान्स शर्यतीमधील एकुणात विजेत्या स्पर्धकावर पारितोषिकांची खैरात केली जाते. अनेक प्रायोजकांमध्ये त्याला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करण्यासाठीही चढाओढ निर्माण होते. येनकेनप्रकारेण विजेतेपद मिळवीत प्रसिद्धी व पैसा कमावण्यासाठी अनेक खेळाडूंनी उत्तेजक औषधे सेवन करण्याचा अवैध मार्ग स्वीकारला. त्यामुळे अनेक वेळा या शर्यतीस गालबोट लागले आहे. अमेरिकेचा लान्स आर्मस्ट्राँग हे या गालबोटाचे ज्वलंत उदारहण आहे. कर्करोगाच्या आजारातून बरा झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला नियमित सायकलिंग करण्याचा सल्ला दिला. त्या व्यायामाद्वारे त्याला सायकलिंगची विलक्षण आवड निर्माण झाली. टूर डी फ्रान्स शर्यतीतही भाग घेण्याचे त्याला आकर्षण वाटू लागले. त्यामध्ये त्याने भाग घेण्यास सुरुवात केली. त्याने १९९९ मध्ये या शर्यतीचे विजेतेपद मिळविले. त्यानंतर सलग सात वेळा त्याने ही शर्यत जिंकली. त्याच्या या अतुलनीय कामगिरीचे साऱ्या जगात कौतुक झाले. शेकडो प्रायोजकांनी त्याच्या पायावर पैशाची लोळण घातली. त्याचे आत्मचरित्रही लोकप्रिय झाले. मात्र खुद्द अमेरिकन सायकलिंग संघटनेस त्याच्या या यशामागे उत्तेजक सेवनाचा हात असावा अशी शंका निर्माण झाली. सखोल चौकशीनंतर १९९९ पासून त्याने या शर्यतीच्या वेळी उत्तेजक औषध सेवनाचा आधार घेतला आहे असे दिसून आले. सुरुवातीला आपण त्यामध्ये दोषी नाहीत असे त्याने सांगितले मात्र वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर ‘हा सूर्य हा जयद्रथ’ हे सिद्ध झाले. त्यानेही आपण नियमित उत्तेजकाचा आधार घेत असल्याचे कबूल केले. कोटय़वधी चाहत्यांपुढे आदर्श असलेला हा खेळाडू क्षणार्धात काळ्या यादीत गेला. अनेक प्रायोजकांनी त्याचे प्रायोजकत्व काढून घेतले एवढेच नव्हे तर त्याने आपली फसवणूक केली आहे असा दावा करीत काही कंपन्यांनी त्याला न्यायालयात खेचले आहे. एकेकाळी हिरो असलेला हा खेळाडू सध्या न्यायालयात चकरा मारीत आहे.
आर्मस्ट्राँगने या शर्यतीत जिंकलेली विजेतेपदे संयोजकांनी रद्दच केली व अन्य कोणत्याही खेळाडूला त्या वर्षीचे विजेतेपद बहाल केले नाही. साहजिकच आर्मस्ट्राँग हा या शर्यतीच्या इतिहासात कायमस्वरूपी काळ्या यादीत गेला आहे. त्याच्याप्रमाणेच अन्य काही खेळाडूंनीही उत्तेजकाचा आधार घेतला व आपल्या पायावर कारवाईचा धोंडा मारून घेतला.
स्पर्धकांच्या सर्वागीण कौशल्याची खडतर कसोटी पाहणारी ही शर्यत प्रत्येक सहभागी खेळाडूसाठी खूपच महत्त्वाची असते. अनेक देशांमधील अव्वल दर्जाचे खेळाडू या शर्यतीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शर्यतीपूर्वी काही महिने अगोदरच शर्यतीच्या मार्गात सरावास सुरुवात करतात. ही शर्यत फक्त फ्रान्सपुरती मर्यादित राहिलेली नाही. नेदरलँड्स व बेल्जियममधूनही या शर्यतीचा मार्ग जातो. यंदा नेदरलँड्समधून या शर्यतीस प्रारंभ होणार आहे. यंदाच्या शर्यतीत नऊ ठिकाणी सरळ मार्ग असणार आहे तर तीन ठिकाणी कमी उंचीच्या डोंगरांमधून मार्ग आहे. अति उंचीवरील पर्वतराजीमधून सात शर्यती होणार आहेत आणि त्यांची अंतिम रेषाही अति उंचीवरच असणार आहे. शर्यतीच्या एका टप्प्यात वैयक्तिक वेळ, कौशल्य चाचणीचा समावेश आहे तर एकदा सांघिक वेळ, कौशल्य अजमावले जाणार आहे. ही शर्यत कितीही आव्हानात्मक असली तरी स्वत:चे कौशल्य, शारीरिक व मानसिक क्षमता अजमावण्यासाठी शेकडो स्पर्धक दरवर्षी प्रयत्न करीत असतात हीच या शर्यतीची खासियत आहे. फुलांचे ताटवे, शेतामधून जाणाऱ्या मार्गातून सायकलिंग करण्याचीही अनेकांना आवड असते. त्यासाठीदेखील अनेक खेळाडू या शर्यतीत भाग घेतात. कितीही अडचणी आल्या, उत्तेजकासारख्या काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या तरीही या शर्यतीची लोकप्रियता टिकून आहे.
मिलिंद ढमढेरे response.lokprabha@expressindia.com