लोकसभा निवडणुकीत  झालेल्या दारुण पराभवावर चिंतन करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. उद्या (शनिवारी) होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व काँग्रेसच्या विविध संघटनांच्या प्रमुखांशी पक्षश्रेष्ठी चर्चा करणार आहेत.
पराभवाची मीमांसा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या समितीत ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटोनी, गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आदींचा समावेश आहे. ही समिती राज्यनिहाय निवडणूक आढावा घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करून विधान परिषद निवडणुकीची तयारी करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. या बैठकीत मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर, प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक व सर्वात कमी मताधिक्क्याने पराभूत झालेल्या दोन उमेदवारांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. विजयी उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विजय सातव यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलाचा दावा काँग्रेस सूत्रांनी केला असला तरी रात्री उशिरापर्यंत सातव यांना बैठकीचा निरोप मिळाला नव्हता. या बैठकीला बोलावण्यात आलेल्या प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे समितीचे सदस्य चर्चा करतील. ज्यात प्रामुख्याने पराभवाची कारण, विरोधी पक्षाचे डावपेच व संघटनात्मक बदलांवर चर्चा केली जाईल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या उचलबांगडीची शक्यता होती. परंतु हायकमांडने त्यांना अभय दिले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, माणिकराव गावित, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, विलास मुत्तेमवार आदी दिग्गज नेते आहेत. याशिवाय दत्ता मेघे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना स्वत:च्या मुलांना निवडून आणता आलेले नाही.  या नेत्यांची आपापल्या मतदारसंघावर जोरदार पकड होती. मात्र तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असे सांगून चव्हाण यांनी स्वत:ची खुर्ची बचावली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उचलबांगडीची शक्यता आहे. त्यासंबंधी अंतिम निर्णय उद्या (शनिवारी) होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.