एक नाही तर तब्बल तीन मतदारसंघांचा भावी आमदार अशी फलकबाजी, उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, निलेश राणे यांना पारंपारिक प्रतिस्पर्धी विजय सावंत यांनी दिलेले आव्हान हे काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींच्या शेवटच्या दिवसाचे आकर्षण ठरले. मुंबईतील काही इच्छुकांनी मोठय़ा प्रमाणावर समर्थक जमवून शक्तिप्रदर्शनही केले. एकूणच काँग्रेसमधील इच्छुकांचा कालचा गोंधळ मागील पानावरून पुढे सुरू.. असेच चित्र होते.
काँग्रेसने गत वेळी लढविलेल्या १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या तीन दिवस मुलाखती घेतल्या. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत शेवटच्या दिवशी अधिक उत्साह होता. मुंबई व ठाण्यातील इच्छुकांनी समर्थक मोठय़ा प्रमाणावर बरोबर आणले होते. टिळक भवन या पक्षाच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आलेला एक फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. शंकर हेगडे या इच्छुकाने स्वत:चा उल्लेख भावी आमदार असा केला होता. पण हा भावी आमदार एका मतदारसंघाचा नाही, तर तब्बल तीन मतदारसंघांचा आहे! शिवडी, वडाळा व सायन- कोळीवाडा या तीन मतदारसंघांत इच्छुक असून, कोणत्याही मतदारसंघात उमेदवार दिल्यास निवडून येणारच, असा या इच्छुकाचा दावा होता.
कणकवली मतदारसंघात इच्छुक म्हणून निलेश राणे हे मुलाखतीसाठी आपल्या समर्थकांसह आले होते. याच मतदारसंघात राणे यांचे प्रतिस्पर्धी आमदार विजय सावंत यांनी उमेदवारी मागितली आहे. विजय सावंत यांनी कणकवलीसाठी काय केले, असा सवाल निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सध्या राणे यांच्याबरोबर असलेल्या संदेश पारकर यांनी कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीन मतदारसंघांमधून उमेदवारी मागितली आहे. कोठेही द्या, पण उमेदवारी द्या, अशी पारकर यांची मागणी आहे. मात्र राणेसाहेब सांगतील तेथूनच लढणार असे एकेकाळी राणे यांचे कट्टर विरोधक असलेले पारकर सांगण्यास विसरले नाहीत.

मुलाखतीत थेट ‘जात’ विचारली जाते
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बसवराज पाटील नागराळकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिली. ते म्हणाले की,  नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मला संधी मिळाली नाही, याचे फारसे वाईट वाटत नाही. मात्र, मुलाखती दरम्यान मला थेट ‘जात’ कोणती, असा प्रश्न विचारला गेला याची मात्र जरूर खंत वाटते आह़े