मतदानाचा दिवस जवळ आल्याने सर्वच पक्षांच्या प्रचारात प्रचंड वेग आला आहे. मुंबईत सर्व पक्षीय उमेदवारांनी मतदानाच्या आधी मिळालेल्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा प्रचारासाठी पुरेपूर फायदा करुन घेतला. सभा, मेळावे, पदयात्रा, प्रचार फेऱ्या, रोडशोचा चांगलाच धुरळा उडाला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेची खूपच उत्सूकता होती. परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्याने ऐनवेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. रविवारच्या प्रचारातील काँग्रेसची ही सभा खास आकर्षण ठरली. काँग्रेसने या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
मुंबईसह १९ मतदारसंघात २४ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी व उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. त्यासाठी रविवारचा सुट्टी दिवस कारणी लावला.  
मुंबईतील काँग्रेसच्या पाचही उमेदवारांनी सकाळी अकरा-बारा वाजेपर्यत प्रचार उरकून घेऊन राहुल गांधी यांच्या सभेसाठी वांद्रे-कुर्ला संकुलाकडे धाव घेतली. दक्षिण-मध्य मुंबईतील उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी गोवंडी येथे पदयात्रा काढून मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यानंतर रात्री धारावीत सभा झाली. याच मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी अनुशक्तीनगर ते चुना भट्टी असा रोड शो करण्यात आला. त्यात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले सहभागी झाले होते. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अरिवद सावंत यांचीही प्रचारफेरी काढण्यात आली.
इशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील, भाजपचे किरिट सोमय्या, बसपचे मच्छिंद्र चाटे, आपच्या मेधा पाटकर, भारिप-बहुजन महासंघाचे प्रा. अविनाश डोळस यांनी पदयात्रा, प्रचार फेऱ्या काढल्या. डोळस यांची टागोरनगरला पदयात्रा झाली. रात्री भांडूपला प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या प्रचारासाठी सभा झाली. उत्तर पश्चिम मुंबईतील बसपच्या पुष्पा भोळे यांचीही प्रचार फेरी व सांयकाळी जाहीर सभा झाली. अभिनेत्री राखी सावंत यांच्या प्रचारार्थ जोगेश्वरी येथे रोड शो करुन प्रचारात झगमगाट निर्माण केला. कांदिवली येथील भाजपचे गोपळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली.
राहुल गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने काँग्रेसने रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राहुल यांच्या भाषणामुळे काँग्रेसच्या प्रचारात जान आली. आता सोमवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि उमेदवारांना उद्याच्या मोदींच्या सभेचे वेध लागले आहेत. भाजपनेही शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.