*  गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्हय़ात सर्वदूर पाऊस होत असून या पावसाने पाण्याचे विघ्न टळले. जिल्हय़ात तीन दिवसांच्या पावसाने निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, आदी तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

* सलग दोन दिवस निलंगा, शिरूर अनंतपाळ व औसा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हजारो एकर जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान झाले.

* बीड जिल्ह्य़ात पावसाने सलग दोन दिवस दमदार हजेरी लावल्याने २४ तासात ३३.८ मि.मी. पाऊस झाला असून वार्षकि सरासरीच्या तुलनेत ६९ टक्क्य़ांचा पल्ला गाठला आहे. पाटोदा व परळी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

* दुष्काळाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यला मागील तीन दिवसात पडलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. उमरगा आणि नारंगवाडी मंडळात बारा तासांत दीडशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा तालुक्यातील त्रिकोळी गावात अनेक घरांची पडझड झाली आहे. दुष्काळातून उरलीसुरली पिकेही अतिवृष्टीमुळे पाण्यात गेली आहेत.

* परभणी जिल्ह्यत २४ तासात ४५.९७ अशी पावसाची नोंद झाली. या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यत आतापर्यंत ५५९.२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  लोअर दुधना धरण ७४.४९ टक्के भरल्याची नोंद आहे.  पालम तालुक्यातील धोंड या नदीला पूर आला.  त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीन व कापूस उत्पादकांना या पाण्याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

* औरंगाबाद जिल्ह्य़ात गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे अतिवृष्टी झाली. अन्य तालुक्यातही पावसाचा जोर होता. जिल्ह्य़ात अपेक्षित सरासरीच्या ८४.८० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. अन्य जिल्ह्य़ाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्य़ातला पाऊस आता तुलनेने कमी झाला आहे. मात्र, दोन दिवस जिल्ह्य़ात सर्वदूर पाऊस होता.