देशभरात राजकारण, अर्थकारण आणि व्यापारीकरण या तीनही क्षेत्रांत आपला प्रभाव पाडणारी तूर भविष्यात या क्षेत्रांशी संबंधित सर्वाची चिंता दूर करण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण आहे तुरीची अमाप लागवड. एकटय़ा धुळे जिल्ह्य़ाचे उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे. जिल्ह्य़ातील २७ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली असून हेक्टरी ५० हजारांपेक्षाही अधिक उत्पन्न होईल, असा विश्वास शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. तूर उत्पादन वाढीमागे कृषी विभागाचे संशोधन तसेच प्रयोग कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. तूरडाळीचे भाव २४० आणि २६० रुपये किलो असे गगनाला भिडले होते. या स्थितीचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडून डाळीची कृत्रिम टंचाई करण्यात आल्याने डाळ अधिकच महाग झाली. संपूर्ण देश डाळीसाठी अक्षरश: वेठीस धरला गेल्याची स्थिती निर्माण झाली होती. अशी स्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे तुरीच्या लागवडीवरून सध्या तरी दिसत आहे. त्यातही धुळे जिल्हा तूर लागवडीत आघाडीवर आहे. केंद्र आणि राज्य सरकारला अडचणीत आणणाऱ्या तूरडाळीचे धुळे जिल्ह्यत यंदा विक्रमी उत्पन्न येण्याचे चिन्ह आहे.

संपूर्ण देशभरात तूरडाळीवर राजकारण झाले. त्यास कारण होते ते तूरडाळीच्या विक्रमी भाववाढीचे. डाळीचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर थेट परिणाम झाल्याने जेवणातून तुरीचा कमीत कमी वापर होऊ लागला होता. सर्वच जण तुरीच्या वाढत्या किमतींबद्दल सरकारला दोष देत होते. भाववाढ सामान्यांना न परवडणारी असली तरी उत्पादन वाढले तर तूर उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी लाभाची बाब ठरेल. हा हेतू ध्यानात घेत धुळे जिल्ह्यात अधिकाधिक क्षेत्रात तूर लागवडीचा पर्याय स्वीकारला गेला. शासनाच्या पीक लागवडीच्या धोरणाला चालना देत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड केली आहे. कृषी विभागाचे तंत्र अधिकारी के. पी. देवरे यांनी याविषयी माहिती दिली. या वर्षी कृषी विभागाने राज्यात पहिल्यांदा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तुरीच्या वाणाचे प्रयोग केले. धुळे जिल्ह्यात या प्रयोगांतर्गत २०० हेक्टर क्षेत्रात तूर लावण्यात आली असून हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी झाला असल्याचे देवरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तुरीचे विक्रमी उत्पन्न मिळणार आहे. या वाणाची प्रतिकार शक्ती अधिक असल्याने मर आणि वांज रोगास हे वाण पुरून उरते. उत्पन्न ३५ ते ४० टक्के अधिक होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप निकम यांनी राज्य शासनाकडून होणाऱ्या सहकार्याचा उल्लेख केला. ठिबक सिंचनावर राज्य शासनाद्वारा पुरस्कृत या तुरीचे उत्पन्न घेता येते. हेक्टरी या तुरीचे उत्पन्न १२ ते १३ क्विंटल येत असून हेक्टरी खर्च ११ ते १२ हजार रुपये वजा करता शेतकऱ्याला सरासरी ५० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते, असे गणित त्यांनी मांडले. धुळे तालुक्यातील वडजाई येथील तूर उत्पादक तुकाराम पाटील यांनी शेतकऱ्यांना तूर उत्पादन घेताना कृषी विभागाची मदत मिळत असल्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. कृषी विभागाच्या मदतीमुळेच शेतकऱ्यांना कमी खर्चात तुरीचे भरघोस उत्पन्न घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तुरीचा प्रयोग धुळे जिल्ह्यत तरी यशस्वी झाल्याचे चित्र आहे. तुरीचे असेच उत्पन्न निघत राहिल्यास राज्यात तूरडाळीच्या टंचाईचे संकट राहणार नाही, असा आत्मविश्वास कृषी विभागासह तूर उत्पादकांनी व्यक्त केला आहे. स्वस्त धान्य दुकानांतून तूरडाळीचे वितरण होईल या आशेवर असलेल्या बहुतांश शिधापत्रिकाधारक कुटुंबीयांनी खुल्या बाजारातून डाळ खरेदी करणे टाळले होते. सरकारकडून शिधापत्रिकाधारकांसाठी तत्काळ डाळ उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. जी डाळ उपलब्ध झाली ती उशिरा आणि अपेक्षित किमतीत पुरविण्यात आली नाही. १०३ रुपये किलो असलेली ही डाळ शिधापत्रिकाधारकाला प्रत्येकी एक किलो या प्रमाणातच वितरित करण्यात आल्याने हिरमोड झाला होता. सरकार जी डाळ स्वस्त धान्य दुकानांतून १०३ रुपये किलो या दराने वितरित करीत होते तीच डाळ खुल्या बाजारात मात्र केवळ ८० रुपये किलो या दराने उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानांकडे पाठ फिरवून खुल्या बाजारातून तूरडाळ खरेदीला प्राधान्य देणे पसंत केले होते. तूरडाळीचे उत्पादन अचानक कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कडधान्ये अधिकाधिक प्रमाणात घ्यावीत, असे आवाहन शासनाने केले होते. ज्या मराठवाडय़ात तुरीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते, त्या भागातही तूर हवी तेवढी घेतली गेली नव्हती. कपाशीतील आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन घ्यावे, असे पिकांचे नियोजन केल्यास जमिनीचा पोत कायम राहीलच, शिवाय कपाशी आणि तुरीचे उत्पादनही अपेक्षेप्रमाणे घेता येईल असे सरकारतर्फे सुचविण्यात आले होते. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

या अनुभवातून गेलेल्या धुळे जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादन घेऊन कृषी बाजारपेठेतील प्रामुख्याने तूरडाळ टंचाई काहीशी दूर करण्यास हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. तूर बाजारात गेल्या वर्षी दुष्काळामुळे सहा ते सात हजार रुपये क्विंटल भाव होता. या वेळी मात्र हा दर एक हजाराने कमी झाला आहे. भविष्यात आवक वाढून दर अजून कमी होतील. परतीच्या पावसाने आलेले तुरीचे उत्पन्न यंदा वाढल्याने हमी भावाची मागणी होऊ  शकेल, अशी माहिती तूर व्यापारी गणेश चौधरी यांनी दिली.

मनेश मासोळे santoshmasole@gmail.com