साहित्य क्षेत्रातील सर्वाचा सन्मान करणारे म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची ओळख होती. मात्र, याच लातुरात साहित्य संमेलनासाठी आजवर एकाही पुढाऱ्याने छदामही मदत केली नाही. साहित्यिकांची उपेक्षा करणारा विलासरावांचा वारसा असा कसा? अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व २१ व्या नवोदित साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक शरद गोरे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली.
एकविसाव्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनास औरंगाबादच्या काँग्रेसच्या मेळाव्यामुळे मंत्र्यांसह अनेक पाहुणे गैरहजर राहणार असल्यामुळे शरद गोरे राजकारणी मंडळींवर नाराज असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता परखड विचार मांडले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २५, २६ व २७ जुल असे ३ दिवस लोकनेते विलासराव देशमुख साहित्यनगरी दयानंद सभागृहात हे संमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशीव आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून संमेलनाची तयारी सुरू असून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे उद्घाटक, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, उत्पादन शुल्क राज्यमंत्री अमित देशमुख आदी उपस्थित राहणार होते.
मात्र, २६ जुलस औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय काँग्रेसचा मेळावा होणार असून या सर्वच पाहुण्यांनी उद्घाटनास उपस्थित राहण्याबाबत असमर्थता व्यक्त केल्यामुळे संमेलनाचे मुख्य संयोजक व परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोरे यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. पत्रकार बैठकीस संमेलनाचे निमंत्रक व इम्पाचे संचालक विकास पाटील, परिषदेच्या शहराध्यक्षा नयना राजमाने उपस्थित होते.
गोरे म्हणाले की, संमेलनास गेल्या दोन वर्षांपासून मिळणारे अनुदान सरकारने बंद केले आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भाषा विभाग सुरू केला. या विभागातील अनागोंदीवर टीका करताना गोरे यांनी, आम्ही अनुदान मागितले की अजून निकष ठरले नाहीत, असे सांगितले जाते व निकष न ठरता इतरांना कसे अनुदान दिले जाते, असा सवाल उपस्थित केला. मंत्र्यांनी साहित्यिकांकडे दुर्लक्ष केल्यास आम्हालाही आगामी काळात भूमिका ठरवावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
विलासराव देशमुख हे साहित्य संमेलनास नेहमीच मदत करीत, आपुलकीने वागत. त्यांची स्मृती जागविण्यासाठी संमेलनस्थळास त्यांचे नाव देण्यात आले. मात्र, त्यांच्याच लातुरातील एकाही राजकीय पुढाऱ्याने संमेलनासाठी आतापर्यंत छदामही दिला नाही. विलासरावांचा हा वारसा असा कसा, या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
निमंत्रक विकास पाटील यांनी मात्र आपण आशादायी असून उद्घाटक संमेलनास उपस्थित राहतील, असे मत व्यक्त केले. तीन दिवसीय संमेलन ठरल्याप्रमाणे होईल. ऐनवेळी उद्घाटक बदलून संमेलन घेतले जाईल. संमेलनात २५ जुलस ग्रंथिदडी निघेल तर २६ जुलस उद्घाटनानंतर कथाकथन, कविसंमेलन व महिलांवरील वाढत्या अत्याचाराला जबाबदार कोण, या विषयावर परिसंवाद होईल. २६ जुलस रात्री व २७ जुलस सकाळी कविसंमेलन होईल. २७ जुलस समाज प्रबोधनात संत साहित्याचे योगदान, समाज परिवर्तनात प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयांवर परिसंवाद होईल. लातूरकर साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोरे यांनी केले.