महिलांवरील अत्याचाराचे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित असलेले खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्यात नवीन २५ जलदगती न्यायालये सुरू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८२ व्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियान या महिलांसाठीच्या नवीन अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,‘‘१५० वर्षांपूर्वी सावित्रीबाइंनी महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची जाणीव करून दिली. तीच परिस्थिती आजही आहे. त्यांच्या विचारानंतर शंभर वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पन्नास टक्के समाज शोषित राहू नये म्हणून महिलांसाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत. शिक्षणात अनेक सुविधा निर्माण केल्या. महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने या वर्षांत आपण तिसरे महिला धोरण आणणार आहोत. सुकन्या योजना,  जिजामाता ते सावित्री जाणीव जागृती अभियान, हुंडय़ा सारख्या योजना बंद करणे, कौटुंबिक हिंसाचार, आदींबाबत कडक पावले उचलत आहोत. एल आय सीच्या माध्यमातून मुलींच्या नावावर रक्कम ठेवण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. १२ वी ते पदवीपर्यंत शिक्षण मुलींसाठी योजना जाहीर करणे, राज्यातील मेरीटच्या पहिल्या ५० मुलींना स्पेसच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. अशा अनेक प्रकारे महिलांना सबल करण्याच्या व संरक्षणाच्या योजना शासनाने आणलेल्या आहेत.
यावर्षी राज्यात मोठा दुष्काळ आहे. आपण दुष्काळी भागात अनेक कामे केली, योजना दिल्या.  परंतु यापुढे धोरण ठरविताना पाणी पुरविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.