गोव्याहून बेकायदेशीररीत्या आणला जाणारा विदेशी दारूचा साठा गुरुवारी अबकारी कर विभागाच्या पथकाने पकडला. गोकुळ दूध संघाच्या ट्रकमधून ही दारू आणली जात होती. या कारवाई अंतर्गत पथकाने ९ लाख ६० हजार रुपये कि मतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक व वाहक यांना अटक करण्यात आली.
गोवा राज्यातून एका ट्रकमधून बेकायदेशीररीत्या विदेशी दारूचा साठा आणला जाणार असल्याची माहिती अबकारी कर विभागाचे निरीक्षक व्ही. के. जाधव यांना समजली. त्यानुसार त्यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी या गावाजवळ सापळा रचला. हा ट्रक (क्रमांक – एमएच ०९ सीए ४६६४)  जात असताना पथकाने मिळालेल्या माहितीनुसार तो अडविला. गोकुळ दूध संघाची वाहतूक करणाऱ्या या ट्रकमधील दुधाच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये विदेशी दारूचा साठा आढळला. तो जप्त करण्यात आला. चालक संदीप हिंदुराव पाटील (रा.म्हाळुंग ता. करवीर) व अमित बाजीराव पाटील (रा. भेंडवडे ता. भुदरगड) या अनुक्रमे चालक व वाहकाला अटक करण्यात आली आहे.
‘ गोकुळ’चा संबंध नाही
‘ गोकुळ’च्या दूध वाहनातून अवैधरीत्या दारू वाहतुकीशी संस्थेचा संबंध नाही. यामुळे संस्थेची बदनामी झाली असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच वाहनधारक संस्थेशी असलेला करारही संपुष्टात आणला जाणार असल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.