भारतीय लष्करातील अंतर्गत बाबी, समस्या वा सद्यस्थितीवर सार्वजनिक टिप्पणी करण्याची मुभा अधिकारी व जवानांना करडय़ा शिस्तीमुळे कधीच दिली जात नाही. त्यामुळेच तांत्रिक दोषांमुळे लष्करातील अनेक साधने भारतीय जवानांचे बळी घेत असतानाही लष्करातून त्याविरोधात उघड प्रतिक्रिया व्यक्त होत नाही. मात्र आपल्या जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करणाऱ्या या अधिकारी-जवानांचे नाहक बळी रोखण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्याच पत्नींनी आता पुढाकार घेतला आहे. लष्करातील जुनाट, कालबाह्य सदोष सामग्रीचा वापर तातडीने थांबवून जवानांचे प्राण वाचवावेत, यासाठी या वीरपत्नींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.
काही दिवसांपूर्वी लष्कराच्या हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर बरेली येथे अपघातग्रस्त झाले. त्यात दोन वैमानिकांसह तीन जणांना प्राण गमवावे लागले. या दलाची चित्ता व चेतक हेलिकॉप्टर्स ३५ ते ४० वर्षे जुनी आहेत. त्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे. तरीदेखील या धोकादायक हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येत आहे.
चित्ताच्या अपघातामुळे अस्वस्थ झालेल्या हवाई दलातील वैमानिकाची पत्नी अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले यांनी जुनाट लष्करी सामग्रीच्या विषयावर अन्य अधिकाऱ्यांच्या पत्नींना एकत्र आणण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत जवळपास ४० हून अधिक लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी एकत्र येऊन त्यांनी एका गटाची स्थापना केली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कालबाह्य झालेल्या लष्करी सामग्रीचा विषय तातडीने मार्गी लावावा आणि लष्करी अधिकाऱ्यांचे प्राण वाचवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. धोकादायक लष्करी सामग्रीने आतापर्यंत झालेली मनुष्यहानी आणि नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारसमोर सादर करण्याची तयारी त्यांनी केली आहे. तसेच या घडामोडींची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांसमोर सादर करण्यात येणार आहे.
सीमावर्ती भागात दळणवळण, पुरवठा व्यवस्था व टेहळणी आदींची जबाबदारी सांभाळणाऱ्या लष्कराच्या हवाई विभागाची वर्षांगणिक दोन ते तीन हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होतात. २०१०मध्ये तर अपघातांची संख्या नऊवर पोहोचली होती.

२१८
एप्रिल २०१२ पर्यंत ४८१ मिग विमाने अपघातग्रस्त होऊन १७१ वैमानिक, ३९ नागरिक आणि अन्य संरक्षण सेवेतील आठ जणांचे बळी गेल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.
“लष्करातील अंतर्गत प्रश्नांबाबत अधिकारी फारसे बोलू शकत नाहीत. यामुळे कायद्याच्या कक्षेत राहून या विषयाचे गांभीर्य केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा हा प्रयत्न आहे.”
– अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले, हवाई दलातील वैमानिकाची पत्नी