मराठवाडय़ातील औरंगाबाद व जालना मतदारसंघांत अनुक्रमे ५९ व ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे शिवसेना, भाजपच्या ताब्यात होते. त्यामुळे येथील खासदारांना ‘मुदतवाढ’ मिळते की नाही, या विषयी कमालीची उत्सुकता होती. दिवसभर मतदारांमध्ये उत्साह होता.
मतदान यंत्रे बिघडल्याच्या औरंगाबादमध्ये तीन, तर जालना येथे दोन तक्रारी प्रशासनाकडे आल्या. दोन्ही मतदारसंघांत गेल्या वेळपेक्षा मतदानाचा टक्का वाढला. सकाळी उमेदवारांनी मतदान केल्यानंतर विविध विधानसभा मतदारसंघांत त्यांनी दौरा केला. कोठे काही तक्रारी आहेत का, याचा आढावाही घेतला. जालना जिल्ह्य़ात सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान मतदानाचा वेग चांगला होता. औरंगाबाद शहरात मतदान वेगाने झाले. कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले यावरून कोण निवडून येणार याचे अंदाज बांधले जात आहेत. तरुणांपासून वयोवृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
औरंगाबादेत ५९ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुमारे ५९ टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढला. मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे नितीन पाटील, आम आदमी पार्टीचे सुभाष लोमटे या प्रमुख उमेदवारांसह २७जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. केवळ तीन ठिकाणी मतदानयंत्रे बंद पडली. तेथील मतदान प्रक्रिया लगेच सुरू करण्यात प्रशासनाला यश आले.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळच्या सत्रात उमेदवारांसह प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले. खैरे यांनी जि. प.च्या केंद्रात मतदान केले, तर लोमटे यांनी स्नेहनगर येथील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे नितीन पाटील यांचे मतदान औरंगाबाद शहरात नव्हते. सकाळच्या सत्रात मतदानाला चांगला वेग होता. ऊन अंगावर येण्याआधी सकाळी नऊपर्यंत १०.८९ टक्के मतदान झाले. अकरापर्यंत त्यात ९ टक्क्य़ांनी वाढ होऊन १९.३८ टक्के मतदान झाले. दुपारी एकपर्यंत मतदानाचा वेग चांगला होता. या वेळेपर्यंत ३२.०३ टक्के मतदान झाले. संध्याकाळी सहापर्यंत ५९ टक्क्य़ांपर्यंत मतदान गेले.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १५ लाख ८६ हजार ८८० मतदार आहेत. विधानसभेच्या सहा मतदारसंघांतील मतदानाचे प्रमाण : औरंगाबाद पूर्व ६२ टक्के, औरंगाबाद पश्चिम ६१ टक्के, औरंगाबाद मध्य ५९.५ टक्के, गंगापूर ५७.५ टक्के, वैजापूर ५६ टक्के, कन्नड ५९ टक्के.
शहरात मतदानादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. मतदान केंद्राबाहेर प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शामियाने उभारले होते. येणाऱ्या मतदाराला कोणत्या मतदान केंद्रात त्याचे नाव आहे, हे कार्यकर्ते सांगत होते. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांपासून ते वयोवृद्ध, विकलांग व्यक्तींनीही मतदानात सहभाग नोंदविला. विकलांग व्यक्तीला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी गाडीने नेण्याची मुभा होती. बहुतांश मतदान केंद्रात रॅम्पची व्यवस्थाही होती. मतदारांना आणण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांला गाडय़ांची अथवा रिक्षांची गरज भासली नाही. उत्स्फूर्तपणे मतदान झाले. ग्रामीण भागातही मतदानासाठी उत्साह होता. ऊन अधिक असले तरी दुपारीदेखील मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
लष्करी जवानांचे शिस्तीमध्ये मतदान
छावणी येथील सर्वाधिक मतदार असणाऱ्या केंद्रात शिस्तीत मतदान झाले. या केंद्रातील बहुतांश मतदार लष्कराचे जवान होते. २ हजार २२ मतदारसंख्या असणाऱ्या या केंद्रावर १ हजार ५३ मतदान झाले. यातील ९००पेक्षा अधिक मतदार लष्कराचे जवान होते. त्यांच्यासाठी खास शामियाना उभारला होता. जवानांची काळजी घेता यावी, म्हणून पिण्याच्या पाण्याची व नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
जालन्यात ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक
जालना लोकसभा मतदारसंघात ६० ते ६५ टक्क्य़ांदरम्यान मतदान झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळी पाचपर्यंत ५३.४७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या काळात आणखी १० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
सकाळी नऊपर्यंत सरासरी १२.३६ टक्के मतदान झाले. यात सर्वात कमी १०.३४ टक्के मतदान ९० टक्के शहरी भाग असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघात झाले. सकाळच्या दोन तासांत भोकरदन विधानसभा क्षेत्रात मतदानाचा वेग अधिक होता. ९ ते ११ दरम्यान  मतदानाचा वेग बराच मंदावला. या दोन तासांत लोकसभा मतदारसंघात सरासरी केवळ ४.७७ टक्के मतदान झाले. या काळात पैठण विधानसभा क्षेत्रात केवळ दोन टक्के मतदान झाले.
सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान मात्र उन्हाची तीव्रता असतानाही मतदानाचा वेग चांगला राहिला. या दोन तासांत जालना शहरात सकाळच्या तुलनेत अधिक मतदान झाले. ११ ते १ दरम्यान लोकसभा मतदारसंघात सरासरी ९.३२ टक्के मतदान झाले. या काळात जालना विधानसभा क्षेत्रातील मतदानाचे प्रमाण २०.५४ टक्के, तर बदनापूर विघानसभा क्षेत्रात १९.५७ टक्के होते. दुपारी तीनपर्यंत लोकसभा मतदारसंघात सरासरी ४१.८६ टक्के मतदान झाले.
सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५२.४७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ४४.६८ टक्के मतदान जालना विधानसभा क्षेत्रात, तर सर्वाधिक ६१.०७ टक्के मतदान भोकरदन विधानसभा क्षेत्रात झाले. बदनापूर ५८.८७, सिल्लोड ४६.७८, फुलंब्री ५२.७० व पैठण ५६.७४ याप्रमाणे सायंकाळी पाचपर्यंतची टक्केवारी होती. दहा वर्षांपूर्वी (२००४) जालना लोकसभा मतदारसंघात सरासरी ५५.८९ टक्के मतदान झाले होते.
सदोष यंत्र बदलले
अंबड तालुक्यातील वलखेड तांडा येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम होत नाही म्हणून दुपापर्यंत मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. जाफराबाद तालुक्यातील देवगव्हाण येथील केंद्रावरील एक मतदान यंत्र सदोष असल्याचे प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच लक्षात आले. त्यामुळे ते बदलून देण्यात आले. सायंकाळी पाचनंतर चंदनझिरा व निरखेडा येथील मतदान यंत्रासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नायक यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. १६ मे रोजी जालना शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी आठ वाजता मतमोजणी होणार आहे.
नावे नसल्याच्या तक्रारी
ओळखपत्र असूनही मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी शहरासह मतदारसंघात केल्या जात होत्या. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर दिवसभरात अशा १० तक्रारी आल्या. एक लेखी तक्रारही आली. १ जानेवारी २०१३च्या अर्हता दिनांकावर जिल्ह्य़ाच्या मतदानयादीतील जवळपास ३३ हजार नावे पुनर्निरीक्षण कार्यक्रमात वगळली होती. त्यावेळी वगळलेल्या काही मतदारांच्या या तक्रारी असण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवरून व्यक्त करण्यात आली.