मोहितेंनंतर बबनराव शिंदेंचे जिल्हा परिषदेत अध्यक्षपद निवडीवेळी पाऊल; दोन्ही वेळी भाजप फायद्यात

पुरेसे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी स्वत:चा उमेदवार न देता भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या हाती सत्ता बिनविरोध सोपविताना माढय़ाचे शरदनिष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या बंधुप्रेमाला महत्त्व दिल्याचे उघड झाले खरे; परंतु पक्षांतर्गत या ‘बंधुप्रेमा’चा वारसा आता पहिल्यांदाच मानला गेला नाही तर त्याची सुरुवात यापूर्वी मोहिते-पाटील यांच्यापासून झाली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेससह शेकाप व शिवसेनेबरोबर आघाडी करून सत्ता राखण्याचे गणित जुळविण्यात आले होते. ६८ पैकी जवळपास ४२ सदस्यांचे बळ राष्ट्रवादी आघाडीला मिळत असताना दुसरीकडे भाजप पुरस्कृत महाआघाडीला २८ च्या पुढे सदस्यांचे बळ मिळणे कठीण झाले होते; परंतु भाजप पुरस्कृत महाआघाडीने जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संजय शिंदे यांची उमेदवारी जाणीवपूर्वक आणली आणि त्यांच्या बाजूने त्यांचे बंधू असलेले माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी व्यूहरचना केली.  पक्षाला सावरण्यासाठी स्वत: अजित पवार यांनी पक्षाच्या प्रभारीपदाची जबाबदारी घेतली असताना  जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी फिरकलेसुद्धा नाहीत.

राष्ट्रवादीतील बंधुप्रेमातून दुसऱ्याच पक्षाला ताकद देण्याची सोलापूर जिल्ह्य़ातील ही पहिली घटना नाही. आता भाजप पुरस्कृत संजय शिंदे यांना बिनविरोध निवडून दिल्यामुळे संतापलेल्या मोहिते-पाटील गटाने या अगोदर पक्षाच्या हितापेक्षा आपले ‘बंधुप्रेम’ जपले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे २००३ साली उपमुख्यमंत्री असताना त्याच वेळी झालेल्या सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचे दिवंगत कनिष्ठ बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून उभे राहिले होते.  पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपने प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना मैदानात आणले असता त्या वेळी मोहिते-पाटील गटाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी धर्माला तिलांजली देत केवळ स्वत:च्या बंधुप्रेमापोटी भाजपच्या बाजूने ताकद उभी केली होती.  देवकते यांचा  पराभव करून निवडून आले होते.