नगरला उद्या भाषणे व घोषणाही

राज्यात गेले काही महिने सुरू असलेल्या मराठा, मुस्लीम, ओबीसी समाजांच्या मूक मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी नगरला काढण्यात येणारा बहुजन क्रांती मोर्चा सर्वार्थाने वेगळा ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्यत्वे हा मूक मोर्चा नाही. हा ‘बोलका’ मोर्चा असून यात रितसर भाषणे होणार व मागण्यांबाबत घोषणांच्या माध्यमातून जाहीर रीत्या भावनाही प्रकट करण्यात येणार आहेत. सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने हा मोर्चा राज्याला वेगळी दिशा देणारा ठरेल, असा दावा संयोजकांनी केला आहे.

कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजाच्या वतीने राज्यात सर्वत्र मूक मोर्चे सुरू आहेत. कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणावी, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत. या मोर्चाना राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने हा चर्चेचा विषय बनला. याच धर्तीवर नंतर मुस्लीम व ओबीसी समाजाचेही मोर्चे सुरू आहेत. मात्र हे सगळे मूक मोर्चे असून याच पातळीवर नगरला सोमवारी काढण्यात येणारा बहुजन क्रांती मोर्चा वेगळा ठरणार आहे. या मोर्चाआधी जाहीर सभा होणार आहे, यात पाच वक्त्यांची भाषणे होणार आहेत. त्यानंतर मोर्चातही घोषणांद्वारे भावना प्रकट करण्यात येणार आहेत. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही, किंबहुना मराठा समाजाला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. कोपर्डीतील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, ही मागणीही आम्ही केली आहे, असे संयोजकांनी सांगितले.  हा मोर्चा बोलका का आहे, याचेही स्पष्टकरण संयोजन समितीचे सदस्य प्रा. किसन जाधव यांनी या वेळी केले. राज्यात सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणार असून यातून बहुजन समाजाचे नवे नेतृत्व उदयाला यावे, असाच प्रयत्न आहे. त्यामुळेच बोलका मोर्चा काढणार आहोत, असे जाधव यांनी सांगितले.