विश्वासू सहकाऱ्याच्या लग्नासाठी लवाजम्यासह आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोहळ्याचा आनंद घेतला. मात्र, त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीतील प्रशासकीय अनागोदींच्या अनुभवाने त्यांच्या या आनंदाचे खोबरे झाल्याचे प्रत्यंतर त्यांना आले.     
दोन दशकांपासून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे सुमीत वानखेडे यांचे आज येथे लग्न झाले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रधान सचिव प्रवीण परदेशी व मंत्रालयीन अन्य वरिष्ठांसह वर्धेत पोहोचले. सुलग्न व अन्य विधीसाठी त्यांनी तब्बल दीड तास हजेरी लावली. त्यांच्यासाठी हे घरचेच कार्य असल्याचा त्यांचा वावर होता. त्यानंतर ते भाजप नेते माधव कोटस्थाने यांच्याकडील लग्नासाठी हजर झाले. मंगलमय वातावरणातून मग मुख्यमंत्री आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात उपस्थित कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांचा मंगलकार्यासाठी आजचा खास दौरा असला तरी या दौऱ्यास लालदिव्याचे वलय लाभावे म्हणून शासकीय बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. मंगल व राजकीय कार्यक्रमात प्रसन्नतेने वावरणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आढावा बैठकीत मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला. जलयुक्त शिवार या मुद्यावर चर्चा झाली, पण या योजनेचे जिल्ह्य़ात तीन तेरा झाल्याचे चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी लागलीच हेरले. तात्काळ मंजुरी दिली, पैसा दिला, मग काम रखडले का, असा सवाल करीत त्यांनी दोषींची यादी करण्याची सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना दिली. पावसाळ्यापूर्वी ही कामे पार पाडा. कामे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. त्यांच्या गोपनीय अहवालात शेरा मारू व कारवाई करू, असा सज्जड दम त्यांनी भरला.
याच बैठकीत शेतीपंपाचा विषय उपस्थित झाला. पंपाचे कंत्राट घेणाऱ्या हैदराबादी कंत्राटदाराने ही कामे पेटी कंत्राटदारावर सोपविली. पैसे मात्र दिले नाही. तो गायब तर कामे अधांतरीच. आमदार रणजित कांबळेंनी निदर्शनास आणलेल्या या बाबीवर मुख्यमंत्र्यांचा पुन्हा पारा भडकला. त्यांनी बैठकीतूनच सवार्ंसमक्ष ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना दूरध्वनी लावून कारवाईचे फ र्मान सोडले. एवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर बैठकीत उपस्थित पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देऊन टाकले.
दौऱ्याच्या पूर्वार्धात आनंदात वावरणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आनंद त्यांच्याच प्रशासनाने वर्धा सोडता सोडता मात्र हिरावून घेतला.