यंदा कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले असतानाच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १८ ऑक्टोबरपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येईल, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या कापूस हंगामात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) हमीभावाने खरेदी करणार आहे. यासाठी राज्यभरात पणन महासंघ ६० खरेदी केंद्र आणि सीसीआय १२० खरेदी केंद्र सुरु करणार आहे. हमीभावाने कापसाची खरेदी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या विविध जातींचे दर जाहीर केले आहे. यानुसार ब्रह्मा जातीच्या कापसासाठी ४ हजार ३२० रुपये प्रती क्विंटल, एच- ६ जातीच्या कापसासाठी ४ हजार २२० रुपये प्रती क्विंटल आणि एल आर ए जातीच्या कापसासाठी ४ हजार १२० रुपये प्रती क्विंटल असे हमीभाव आहेत. शेतकऱ्यांनी दर्जेदार कापसाची विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन पणनमंत्र्यांनी केले.