कोकणात पर्यटन उद्योगात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणून पर्यटन विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे, असे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. कोकणच्या पर्यटनात टुर्स ऑपरेटर्स व हॉटेलचा समन्वयाचा अभाव जाणवतो असे त्यांनी सांगितले. द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्था आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा  योजनेअंतर्गत जिल्ह्य़ातील कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेत आमदार निरंजन डावखरे बोलत होते.
यावेळी आमदार अलका देसाई, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, युवा नेते संदेश पारकर, माजी पर्यटन अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष डी. के. सावंत, मोहन कदम, कृष्णराव माळी, मानद सचिव अशोक देसाई, अ‍ॅड. अमित पालव, दीनानाथ बांदेकर, भाई देऊलकर, रत्नागिरी पर्यटन संस्थाध्यक्ष प्रमोद केळकर, व्हिक्टर डॉन्टस, सरपंच आबा सावंत, सूर्यकांत देऊलकर, विलास सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी आर. जी. पाठक, लीड बँकेचे माने, नाबार्डच्या श्रीमती मानकामे, मोहन कदम, संभाजी तांबेकर आदी उपस्थित होते.
सर्वागीण पर्यटनासाठी कोकणचे फार महत्त्व आहे. त्याचा विकास साधताना टुर्स ऑपरेटर्स व हॉटेलमालकांचा समन्वय हवा. विदर्भ व मराठवाडासारख्या भागाला समुद्राचे महत्त्व असते, त्या भागातील पर्यटकांना आणले पाहिजे. कोकणात पर्यटकाला आवडीप्रमाणे खाद्य पुरवठा व्हायला हवा असे आमदार अ‍ॅड. डावखरे म्हणाले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व त्याला सव्‍‌र्हिस रोडची गरज आम. डावखरे यांनी व्यक्त करून केरळात व कोकणात येणारे पर्यटक केरळमध्ये गुंतवणूक जास्त करतात. ही गुंतवणूक वाढवावी लागेल तसेच कोकणात कृषी ग्रामीण पर्यटनाला विदेशी पर्यटक नक्कीच दाद देतील असा दावा आम. डावखरे यांनी केला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे विदर्भाला कापूस व मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला सहकारासाठी अर्थखाते पॅकेज देते तसे कोकणच्या पर्यटन विकासाला अर्थखात्यात खास पॅकेज तरतूद असावी, अशी मागणी केली आहे. त्यात यश मिळेल असे आम. निरंजन डावखरे म्हणाले.
आमदार अलका देसाई म्हणाल्या, केरळमध्ये पर्यटन विकास साधला गेला आहे, तसाच कोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विकास साधून कृषी ग्रामीण पर्यटनाला वाव देण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून सरकारी नोकरावर अवलंबून राहिलात तर विकास अशक्य आहे असे सांगून आम. देसाई म्हणाल्या, कोकणातील लोकांनी संस्कृती, निसर्गाचे रक्षक करत पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधावा, त्यासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, कोकणचा कॅलिफोर्नियाच्या घोषणा ऐकण्यासाठी प्रत्यक्षात कॅलिफोर्निया पाहिल्यावर कोकणच्या पर्यटनाचे खरे स्वप्न डोळ्यासमोर उभे राहिले. डी. के. सावंत यांनी पर्यटन चळवळ उभी करण्यासाठी सुरू केलेली धडपड महत्त्वाची असून पायाभूत सुविधा उभ्या राहतील असे म्हटले.
सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला गोवा राज्यापेक्षा पर्यटनासाठी देणगी लाभली आहे. तसेच आज मालवण-तारकर्ली व किल्ल्यावर लाखो पर्यटक येत आहेत. शासनाने पर्यटनासाठी खास बजेट तरतूद केली पाहिजे, तसेच विमानतळ, सी-वर्ल्डसारखे प्रकल्प सिंधुदुर्गचा कायापालट करतील असे राजन तेली म्हणाले.
काँग्रेसचे युवा नेते संदेश पारकर यांनी, लोकांनी जमिनी विकू नये असे आवाहन करून पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून विकास साधण्यासाठी आवाहन केले. पर्यटनाचा आराखडा गावातील लोकांना विश्वासात घेऊन बनवावा असे संदेश पारकर म्हणाले. यावेळी डी. के. सावंत, व्हिक्टर डॉन्टस यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस वाहतूक हवालदार दत्तात्रय देसाई यांना आदर्श पर्यटन मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अन्वर खान आणि प्रास्ताविक डी. के. सावंत यांनी केले.