रेल्वेच्या बाबतीत मराठवाडय़ावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठवाडय़ात स्वतंत्र रेल्वे मंडळ निर्माण करावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली. मागणी पूर्ण न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत रेल्वे मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा महासंघाने दिला.
रेल्वेमंत्री झाल्यानंतर प्रथमच सुरेश प्रभू मराठवाडा विभागात येत आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या कात्रीत अडकलेला नांदेड विभाग अन्याय सहन करीत आहे. विभागातून राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारी अजून रेल्वेची सोय नसणे, सर्व जलद गाडय़ा या केवळ ३० कि.मी. प्रतितास प्रमाणे चालवणे, पुणे-मुंबईसाठी अत्यल्प गाडय़ा, अन्यायकारक आणि कंटाळवाणे वेळापत्रक, नांदेड-मनमाड मार्गावर मुंबई, पुणे, बिकानेर, जळगावसारख्या विभागातील जनप्रिय जलद गाडय़ांना जागा नसल्याचे कारण पुढे करताना दरवर्षी आंध्रात जाण्यासाठी आणि आंध्रातून शिर्डीकडे न चुकता गाडय़ा सुरू करण्यात येत आहेत. प्रवाशांकडून नागपूर ते औरंगाबाद, कोल्हापूर ते नांदेड या गाडय़ांची मागणी असताना या गाडय़ांना प्रवासी प्रतिसाद मिळू नये म्हणून स्थगित करणे, वेळापत्रक बदलणे, अंजिठा जलदगाडी मनमाड येथे दिवसभर उभी करणे अशी अन्यायकारक धोरणे दक्षिण मध्य रेल्वेकडून राबवली जात आहेत. या विभागाच्या जाचातून सुटका करण्यासाठी मराठवाडय़ासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ निर्माण करावे, मनमाड-परभणी-मुदखेड मार्गाचे दुहेरीकरण तसेच विद्युतीकरण करावे, औरंगाबाद-पुणे-जळगाव-गुलबर्गा या प्रमुख मार्गावर गाडय़ांची संख्या वाढवावी अशा विविध मागण्या मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास मराठवाडा मुक्तिदिनी रेल्वे मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा स्वातंत्र्यसनिक प्रभाकर वाईकर, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, रवींद्र मुथा, अॅड. माधुरी क्षीरसागर, डॉ. राजगोपाल कालाणी, शंतनू डोईफोडे आदींनी दिला आहे.