एकवीरा देवी यात्रोत्सवावर परिणाम
शहरात सुरू असलेल्या एकवीरा देवीच्या यात्रोत्सवात शनिवारी यात्रेतील व्यावसायिकांनी महापालिकेच्या पठाणी वसुलीच्या निषेधार्थ दुकाने बंद केली. अचानक पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा यात्रोत्सवावर विपरीत परिणाम झाला. पालिका प्रशासन दुकानदारांकडून अवाच्या सवा भाडे आकारणी करीत असून दमदाटी करीत वसुली केली जात असल्याचा आरोप केला आहे. पैसे न भरणाऱ्या दुकानदारांचा माल जप्त करण्याचा प्रकार होत असल्याने याविरोधात व्यावसायिकांनी दुकाने बंद करून संताप व्यक्त केला.
एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त पांझरा नदीकिनारी शेकडो छोटी-मोठी दुकाने, मनोरंजन खेळ आदी थाटण्यात आले आहेत. या व्यावसायिकांकडून पालिका प्रशासन १४० रुपये चौरस फूटप्रमाणे कर आकारणी करीत असून गतवेळपेक्षा हे दर दहा पटीने अधिक असल्याची सर्वाची तक्रार आहे. याचा आर्थिक फटका आम्हाला बसत असून महागाईमुळे आधीच व्यवसाय कमी झाला असताना मनपाकडून कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. मात्र कर आकारणी, भाडे आकारणी मोठय़ा प्रमाणात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अवाच्या सवा दराच्या या वसुलीला सर्वच व्यावसायिकांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, महापालिकेने दोन दिवसांपूर्वी भाडे न भरणाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या. काही दुकानदारांचा माल जप्त करण्यात आला. यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच सकाळी मनपा वसुली पथकाने दुकानदारांना दमदाटी करण्याचा प्रकार घडला. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करीत मंदिराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले.