महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणण्यात येईल. तसेच या धोरणात अधिक सुस्पष्टता आणण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यावर विचार करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या (रुसा) वतीने पात्र महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतच्या चर्चासत्राचे उदघाटन विनोद तावडे यांच्या उपस्थित शुक्रवारी सेंट झेविअर्स महाविद्यालयात झाले. यावेळी ‘रुसा’च्या महाराष्ट्राच्या प्रकल्प संचालक मनिषा वर्मा उपस्थित होत्या.
तावडे यांनी चर्चासत्राला उपस्थिती लावत विविध विद्यापीठाचे कुलगुरु, महाविदयालायचे प्राचार्य आदींची महाविदयालयांना स्वायत्तता देण्याबाबतची मते जाणून घेतली. स्वायत्तता संदर्भात येणाऱ्या अडचणी, याबाबतच्या सूचना तावडे यांनी यावेळी समजून घेतल्या. महाविदयालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे, तसेच स्वायत्तता धोरणाबाबत अधिक स्पष्टता आणण्यासाठी तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्यादृष्टीने येत्या तीन महिन्यांत या विषयाचा अभ्यास करुन त्यावर नक्कीच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. महाविद्यालयांच्या स्वायत्ततेबाबत आजच्या चर्चासत्रात सविस्तर चर्चा करुन काही महाविद्यालयांचे ग्रुप तयार करुन त्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याची सूचनाही तावडे यांनी यावेळी केली.