रायगड जिल्ह्य़ात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेल्या आपत्तीमुळे जिल्ह्य़ात आजवर आठ जणांचा बळी गेला आहे. तर जवळपास १४७ घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून बाधित कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार मदत वाटप केले जाणार आहे. आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्य़ात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जाणांचा, कर्जत तालुक्यातील तुंगी व पोलादपूर तालुक्यातील गोवेले येथे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांचा, तर पनवेल तालुक्यात पत्रा पडून दगावलेल्या एकाचा समावेश आहे. याशिवाय नसíगक आपत्तीमुळे दगावणाऱ्या जनावरांची संख्यादेखील नऊवर गेली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळामुळे जिल्ह्य़ात ९ घरांचे पूर्ण, तर १३८ घरांचे अंशत: नुकसान झाले. पोलादपूर तालुक्यात ३४ व म्हसळा तालुक्यात २१ घरांचे अंशत: नुकसान झाले. अलिबागमध्ये ९, मुरुड तालुक्यात ६, पेणमध्ये १०, पनवेल तालुक्यात १५, उरण तालुक्यात १४, खालापूरमध्ये ३, माणगावमध्ये ४, तळा तालुक्यात ८, रोहा तालुक्यात ३, सुधागड तालुक्यात १, महाडमध्ये ६, श्रीवर्धनमध्ये ४ अशा एकूण १३८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात ५, उरणमध्ये १, माणगावमध्ये १, अलिबाग तालुक्यात २ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. ९ गोठे उद्ध्वस्त झाले. नुकसानभरपाई देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. अलिबाग तालुका पंचायत समिती कार्यालय, अलिबाग तालुक्यातील मौजे बोरघर बायूपाडी सामजामंदिर, भूती येथील स्मशानभूमी, पेण तालुक्यातील कारावा येथील व्यायामशाळा, मोठे वढाव येथील ग्रामपंचायतीचे शौचालय, रोहा तालुक्यातील सांगडे तारवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा, महाड तालुक्यातील फौजी आंबवडे येथील अंगणवाडी, पोलादपूर तालुक्यातील पडचील येथील मंदिर, म्हसळा तालुक्यातील काळोजे येथील कब्रस्थान या सार्वजनिक मालमत्तांचेदेखील नुकसान झाले. याशिवाय जवळपास १०० हून अधिक महाकाय वृक्ष या वादळी पावसात उन्मळून पडली आहेत. संततधार पावसाचा शेतीवरही काही ठिकाणी विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. विशेषत: खारेपाट विभागात भातशेती करणारे शेतकरी धूळपेरणी करत असतात. जून महिन्याच्या सुरुवातीला ही धूळपेरणी केली जाते. सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाल्याने ही भातरोपे जोमाने वर आली होती, परंतु सलग आठ दिवस पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे ही रोप कुजली. त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांनी रब्बी पद्धतीने दुबार पेरणी करावी लागली. त्याप्रमाणे डोंगर भागातदेखील आढे व नाल्यांचे पाणी शेतात घुसल्यामुळे पेरलेली बियाणे वाहून गेली. तेथेदेखील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

कोकणात पावसाचा जोर ओसरला
रत्नागिरी  :गेले काही दिवस कोकणात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा जोर आता उतरला असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात एकूण सरासरी २८२.१० पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्य़ात १ जूनपासून गुरुवापर्यंत सरासरी ९५९.३६ इतकी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात चिपळूण (४९.२२ मिमी) व त्या पाठोपाठ खेड (४५.८५ मिमी) या तालुक्यांमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.