गोव्यातून अलिबाग इथे विक्रीसाठी आणलेली ६० हजार रुपयांची विदेशी दारू रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केली आहे. या प्रकरणी दिनेश प्रभाकर थळकर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गोव्याहून आणलेली विदेशी दारू रायगडात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. यानुसार रोहा बायपास मार्गावर स्मशान भूमीजवळ सापळा रचून गुन्हा अन्वेषण विभागाने एका मच्छीच्या टेम्पोवर छापा घातला. तेव्हा या टेम्पोत मच्छीच्या क्रेटमध्ये सुमारे साठ हजार किमतीची दारू लपवली असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी रोहा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून दिनेश प्रभाकर थळकर या ३८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. गुन्ह्य़ासाठी वापरण्यात आलेला टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.