‘वीस अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. ताकदीने महापालिकेच्या सत्तास्थानावर बसलो आहोत. त्यामुळे आता कोणाचीही भीती नाही. आम्ही ठराव मंजूर करू शकतो. आता विकासाचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे त्यांना काय मोजायचे,’ असा प्रश्न विचारत पालकमंत्री रामदास कदम यांनी एमआयएमला टोला मारला. ‘तुम्हीच त्यांना मोठे केले आहे’ असे पत्रकारांना सांगत ‘त्यांना आम्हाला मोजण्याची गरज वाटत नाही’ असे ते म्हणाले.
महापौर-उपमहापौरपदाची निवड झाल्यानंतर शहर विकासासाठी निश्चित प्रयत्न करू. ‘समांतर’मधील त्रुटी आणि चुका सुधारून घेऊन ‘मातोश्री’मध्ये झालेल्या बैठकीचे फळ काय असते, हे औरंगाबादकरांनाही दाखवून देऊ, असे सांगत कदम यांनी मातोश्रीवरील बैठकीचे राजकारण झाल्याचे आवर्जून स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी या बैठकीवरून विधिमंडळात केलेल्या आरोपामुळे गदारोळ माजला होता.
शहरातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्तांना अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले आहे. अधिक खड्डे कोणत्या भागात आहेत, याचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करा. म्हणजे निधी देता येईल असे सांगत रस्त्यांच्या कामात गुणवत्ता राखली जाईल, असे आश्वासनही कदम यांनी दिले. औरंगाबाद शहराचे नामकरण शासकीयदृष्टय़ा संभाजीनगर केले जाईल, या आश्वासनाची पूर्तता नक्की करू, असे सांगत शहरात पर्यटनाला वाव मिळेल, असे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. भाजप-शिवसेनेत मतभेद नाहीत. प्रत्येक निर्णयासाठी युतीत चर्चा होईल, असे सांगत निर्णयाचे अधिकार स्थानिक नेत्यांकडे असतील, असेही ते म्हणाले. स्थानिक नेत्यांमध्ये त्यांनी आमदार अतुल सावे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचा आवर्जून उल्लेख केला.
तनवाणींना टोलेबाजी
महापौरांच्या दालनात माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर चांगलीच टोलेबाजी झाली. तनवाणींना भाजप कळला का हो,  असे पालकमंत्र्यांनीच खोचकपणे विचारले. एवढे दिवस शिवसेनेत राहून त्यांना शिवसेना कळली नाही. भाजप कसा कळेल? असे ते म्हणाले. तनवाणी यांनी अपक्ष उमेदवारांना बऱ्यापैकी फूस दिली होती, असा संदर्भ त्यामागे होता. त्यावर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. डॉ. भागवत कराड म्हणाले की, तेथे त्यांना संधी मिळाली नाही. आमच्याकडे ती आहे. म्हणूनच ते आमच्याकडे आहेत. तनवाणींवर टोलेबाजी करण्यात शिवसेनेचे नेते आघाडीवर होते.