नव्या दरानुसार २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांचे नवीन बिल अंदाजे प्रति युनिट ३.३१ रुपये तर २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांचे २.९६ रुपये असणार आहे, अशी माहिती प्रताप होगाडे यांनी दिली.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशामुळे निश्चित झालेल्या नवीन वीज आकारानुसार २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांच्या वीज आकारात प्रति युनिट ३७ पसे वाढ झालेली आहे, तर २७ अश्वशक्तीच्या वरील यंत्रमागधारकांच्या वीज आकारात १३ पसे प्रति युनिट घट झालेली आहे. हा थेट फरक प्रति युनिट ५० पसे आहे. त्याशिवाय रात्रीची वीजदर सवलत २५० पसे/युनिट वरून १५० पसे/युनिट झाल्याच्या परिणामी प्रति युनिट १२ पसे वाढणार आहेत. एकूण सर्व आकारांचा हिशोब केल्यास २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांचे बिलींग प्रति युनिट ३.३१ रुपये व २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांचे बिलींग प्रति युनिट २.९६ रुपये प्रमाणे होणार आहे. भरुदड फक्त लहान यंत्रमागधारकांवर पडणार आहे. २७ अश्वशक्तीच्या वरील ग्राहकांच्या बिलात वाढ होणार नाही. त्यामुळे राज्यातील २७ अश्वशक्तीचे खालील ९० टक्के छोटय़ा यंत्रमागधारकांवरील हा वाढीव बोजा रद्द करावा व सर्व लघुदाब यंत्रमागधारकांना एकच समान वीजदर लागू करावा ही मागणी राज्यातील सर्व यंत्रमागधारक संघटनांनी व यंत्रमाग क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे त्वरित करावी असे जाहीर आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, होगाडे यांनी केले आहे.
राज्य सरकारने वरील शासन निर्णयानुसार इंधन समायोजन आकारामध्ये ५० टक्के सवलत दिलेली आहे व ती कायम आहे. तथापि ५० टक्के सवलत हा शासन निर्णय वीज आकारासाठी आहे असा संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ५० टक्के सवलत वीज आकारासाठी नाही याची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी असे आवाहन शेवटी होगाडे यांनी केले आहे.