दोन वेळचा चहा आणि जेवण एवढीच ६५ वर्षांच्या जगदीश निंगप्पा बेडगे यांची गरज. ६ जणांचे कुटुंब. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. शेती एके शेती. ४ एकर शेतीत या वर्षी २५ हजारांचे कर्ज काढून बियाणे पेरले. हाती काहीच लागले नाही. दोन खोल्यांच्या घरात ६ माणसांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेडगे पती-पत्नींचे वय झाल्याने शेतीचे रहाटगाडगे कोणी ओढायचे आणि कसे, असा प्रश्न आहे. लोहारा तालुक्यात अशा शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि एकच सवाल केला जातो. सांगा, कसे जगायचे?
उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाटय़ाला मागील चार वर्षांपासून भीषण दुष्काळ आहे. लोहारा, उमरगा व उस्मानाबाद तालुक्यात अवर्षणाची गंभीर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. बँकेचे कर्ज फेडण्याचे साधनच आता मावळल्याने कर्जाची धास्ती आहे. त्यातच पीक नुकसानीची भरपाई, पीकविमा मागील महिनाभरापासून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना दिला नसल्याने कमालीची निराशा आहे. ढगाळ वातावरणाकडे पाहून डोळ्यात अश्रू घेऊन दिवस काढणाऱ्या शेतकऱ्याकडे पशुधन आणि कुटुंबीय जगविण्यासाठी पीकविम्याच्या रकमेचा आधार होईल, असे वाटले होते. परंतु राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे चित्र उलटे पालटले गेले आहे.
लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथील ६० वर्षीय शेतकरी शिवाजी सुरवसे यांना पाच एकर शेती आहे. पत्नी, मुलगी, दोन मुले, नातवंडे, असे आठजणांचे कुटुंब आहे. पाच फुट उंची असलेले, पत्र्यांच्या दोन खोल्यांच्या घरात ते राहतात. पाच एकर शेतीवरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चांगले घरदार बांधून मुलाबाळांना उच्च दर्जाचे शिक्षण देता येईल, या आशेने शेतात ढोर मेहनत करीत आहेत. उसनवारी पसे घेऊन तर कधी सावकाराकडून कर्ज घेऊन शेतात बी-बियाणांसाठी खर्ची घातले. मागील चार वर्षांत घातलेल्या पशाइतकेही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे चरितार्थ चालतो तो मोलमजुरीवर. मुलीचा व नातवांच्या शिक्षणाचा खर्च, अधूनमधून दवाखान्याचा खर्च करावा लागतो. मुलगी उपवर झाली. तिच्या लग्नाच्या खर्चासाठी पसे कसे उपलब्ध करायचे, हातउसणे घेतलेले व सावकाराकडून घेतलेले पसे कसे फेडायचे, पोटाची खळगी भरायची कशी, असे प्रश्न सतावत आहेत. दोन एकरमध्ये सोयाबीन, एक एकरात उडीद या नगदी पिकांसह हायब्रीड, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. पिकांची उगवण जोमात झाली. मात्र पावसाअभावी डोळ्यासमोर पिके करपून गेली. प्रश्न सर्वाचा एकच आहे, जगायचे कसे?