नक्षलविरोधी अभियान राबविताना जंगलातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन आशिष बळवंत कुमरे (२४) या पोलीस जवानाचा मृत्यू झाला. त्यांना कुरखेडा पोलीस उपविभागाच्या मुख्यालयात शोकाकुल वातावरणात गडचिरोली पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून  मानवंदना दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत शीघ्र प्रतिसाद पथक कोरची पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीपूर जंगलात १९ ऑगस्ट रोजी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घनदाट जंगलातील डोंगर उतरत असताना पथकातील जवान आशिष कुमरे याला अचानक अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागले.

पोलिस उपनिरीक्षक शिवा कराडे व सहकारी जवानांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले, परंतु या उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून सहकाऱ्यांनी त्यांना बांबूचे स्ट्रेचर बनवून चार किमी अंतरावरील लक्ष्मीपूर गावात आणले. तेथून वाहनाने कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

रविवारी सकाळी कोरची येथे शवविच्छेदन करून पार्थिव कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस कार्यालयात आणले. दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात गडचिरोली जिल्हा पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी, विशेष अभियान पथकाचे समीर साळवे, कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, ठाणेदार योगेश घारे, अतुल तावाडे, विठ्ठल मुत्तेमवार, विजय वनकर, सुधीर कटारे, अमोल पवार, उपस्थित होते.  आशिष कुमरे ३०  मे २०१२ रोजी गडचिरोली जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. त्यांची पहिली नियुक्ती झिंगानूर पथकात झाली होती. महिनाभरापूर्वी ते कुरखेडा पथकात रूजू झाले होते. त्याचे वडील बळवंत कुमरे पोलिस दलात कार्यरत होते. त्यांचेही आकस्मिक निधन झाले होते. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहीद कुटुंबीयांचे सांत्वन करून सानुग्रह आर्थिक मदत दिली. त्यांचे पार्थिव येंगाळा येथे अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले.