नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनचा मौदा येथील औष्णिक विद्युत प्रकल्प येत्या ४ जानेवारीला सुरू होत असताना कोराडीतील अतिप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या दोन संचांवर बंद होण्याची टांगती तलवार लटकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोराडी औष्णिक वीज केंद्रातील चिमण्यांमधून निघणारा धूर आणि राख यामुळे प्रदूषणाची सीमारेषा केव्हाच ओलांडली गेली आहे. फ्लाय अ‍ॅशचे प्रमाणही निर्देशित मानांकनापेक्षा अधिक आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेतली असून प्रदूषणस्तर वाढविण्यास कारणीभूत ठरणारे कोराडीचे दोन संच बंद करण्याचे आदेश केव्हाही जारी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता ए. आर. नंदनवार यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी संचांची देखरेख करून गेल्याचे मान्य केले.
प्रदूषण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोराडी औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषण स्तराची चौकशी सुरू असून एकत्र केलेले नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यालय याबाबत कारवाई निश्चित करेल. अत्याधिक प्रदूषणाची दखल न घेतल्याने कोराडी औष्णिक वीज केंद्रातील दोन संच बंद होण्याची वेळ येऊ शकते. महाजनकोच्या अधिकाऱ्यांकडे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यासंदर्भात चौकशी करणार असून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास कारवाईची दाट शक्यता आहे. या संचांना यापूर्वीदेखील कारवाईची नोटीस जारी करण्यात आलेली आहे. एकदा बँक गॅरंटी जप्तीची कारवाईदेखील करण्यात आली आहे. नवीन बँक गॅरंटी दिल्यानंतरच दोन्ही संच सुरू होऊ शकले होते.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महाजनकोला एक संयुक्त कृती योजनादेखील सादर केली होती. या योजनेनुसार प्रदूषण स्तर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, परंतु प्रदूषणाचा स्तर घटविण्यात केंद्राला यश आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोराडी जुन्या फिल्ट बॅग्ज खराब झाल्या आहेत. कोळशाची गुणवत्ता योग्य प्रतीची नसल्याने त्याचा फटका केंद्राला सहन करावा लागत आहे. कोराडीला मिळणारा कोळसा एकदम खराब दर्जाचा आहे. हा कोळसा ‘बी’ श्रेणीचा हवा असताना ई श्रेणीचा कोळसा वापरावा लागत आहे. त्यामुळे महाजनकोपाशी संयंत्रात सुधारणा करणे आणि कोळशाच्या प्रतीकडे गंभीरतेने लक्ष देणे, असे दोन पर्याय आहेत.

यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता ए. आर. नंदनवार म्हणाले, प्रदूषण बोर्डाचे अधिकारी दोन्ही संचांची पाहणी करून गेले, परंतु अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. या विषयावर प्रदूषण मंडळाकडून प्रश्नावली मागविली जाऊ शकते. केंद्राला उच्च दर्जाच्या कोळशाचा पुरवठा होत नसल्याने प्रदूषणाचा स्तर कमी-जास्त होत आहे. कोळशाची प्रत सुधारावी यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहे. परंतु बहुतांश वेळा ‘कोल क्वालिटी’ कमी दर्जाची राहत असल्याने धूर आणि फ्लाय अ‍ॅशचे प्रमाण वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवढे काही करता येईल तेवढे प्रयत्न आणि उपाययोजना आम्ही करीत आहोत.