महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २७.९७ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेचा निकाल मंगळवारी मंडळाकडून जाहीर करण्यात आला.
परीक्षेसाठी एकूण १,४२,९६८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३९९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ते ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७८१५३ इतकी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये एटीकेटीच्या माध्यमातून ११वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने कौशल्य विकास कार्यक्रम निश्चित केला आहे. हे विद्यार्थी कौशल्या विकास कार्यक्रमासाठी पात्र ठरणार आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या २४३३२ इतकी आहे. मंडळाच्या एकूण ९ विभागीय केंद्रांपैकी सर्वाधिक निकाल नागपूर केंद्राचा, ३५.७२ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल कोकण विभागाचा १५.२९ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २५.३७ टक्के इतका लागला होता.
दरम्यान, फेरपरीक्षेत तीन किंवा तीन पेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी हे कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकही गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नाही, असेही राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.