छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरील आपल्या १६७४ च्या राज्याभिषेकानंतर मराठी भाषेवरील फारशी भाषेचे अतिक्रम रोखण्यासाठी राजभाषा व्यवहार कोषाची निर्मिती केली. आणि त्याची अंमलबजावणीही केली, परंतु भारत १९४७ साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर दशकभराने १९६० साली भाषिक प्रांतरचना होऊनही महाराष्ट्रात मराठी भाषा इंग्रजी आणि िहदी भाषेपुढे उपरी ठरली. आणि नावाला ती महाराष्ट्राची राजभाषा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, भ. ल. पाटील साहित्य संस्थेचे अध्यक्ष उमाजी म. केळुसकर यांनी केले.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या राम-नारायण भवनात स्व. प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाचा समारंभ आयोजित केला होता. या समारंभास माजी प्राध्यापिका संध्या कुळकर्णी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, तसेच रायगड जिल्हा मराठी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी, अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक उमेश तथा बाळू पवार, स्व. प्रभाकर पाटील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, सल्लागार सखाराम पवार,  वालेकर, गे. ना. परदेशी, नाटय़अभिनेते व लेखक शरद कोरडे, जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, के.पी. पाटील, मुश्ताक घट्टे, श्रीरंग घरत, विनोद टेंबुलकर, उल्हास पवार, हेमकांत सोनार, वामन पाटील, मििलद जोशी, श्रुती राजे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून उमाजी केळुसकर बोलत होते. त्यांनी मराठी भाषा हजार वर्षांपूर्वीही बोलली जात असल्याचे आक्षीच्या १०१२ च्या शिलालेखाचे उदाहरण देऊन सांगितले.

प्रारंभी बी. बी. जोशी, शैलजा केकाण या स्व. प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ज्येष्ठ वाचकांचा सत्कार उमाजी केळुसकर व संध्या जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर आणि संध्या कुळकर्णी यांचे कुसुमाग्रज आणि त्यांचे साहित्य या विषयावर सविस्तर भाषण झाले. प्रास्ताविक नागेश कुळकर्णी यांनी केले. तर आभार मुश्ताक घट्टे यांनी मानले.