सहकारातील दिवंगत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांच्या पत्नी आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मातोश्री मथुराबाई थोरात यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. बाई या नावानेच त्या सर्वाना परिचित होत्या.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मूळ गावी जोर्वे येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री बी. जे. खताळ, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, अशोक काळे, शंकरराव गडाख, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार जयंत ससाणे, पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे आदींसह मोठा जनसमुदाय या वेळी उपस्थित होता.  
तालुक्यातील कोल्हेवाडी येथे रघुनाथ दिघे यांच्या शेतकरी कुटुंबात १५ मे १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यचळवळीत नुकताच तुरुंगवास भोगून आलेल्या भाऊसाहेब थोरात यांच्याशी १९४४ मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या. काहीशा तापट स्वभावाच्या असलेल्या मथुराबाईंनी आयुष्यभर शिस्तबद्ध जीवनशैली जपली. भाऊसाहेबांचा समाजकारण व राजकारणातील वावर दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना त्यांनी कुटुंब, शेती, मुलांचे संगोपन व नातेवाइकांशी स्नेह जपला. एकत्र कुटुंबातील खटल्याचे घर त्यांनी मोठय़ा जबाबदारीने सांभाळले. भाऊसाहेबांसोबत घरी आलेल्या कार्यकर्त्यांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागवत.
अलीकडचे काही वर्षे त्या आजारीच होत्या. विशेषत: भाऊसाहेबांच्या निधनानंतर त्या अधिकच खचल्या. गुरुवारी तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना डॉ. तांबे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मोहिनी, रोहिणी, शोभा, दुर्गा व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ही मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी आमदार अप्पासाहेब राजळे, माधवराव देशमुख, अरुण कडू व आमदार डॉ. सुधीर तांबे हे त्यांचे जावई होत. नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे व युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांच्या त्या आजी होत.