मोनिका किरणापुरे हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सोनेकर, उमेश मराठे या चार आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी मंगळवारी जन्मठेप ठोठावली तर रामेश्वर सोनेकर व गीता मालधुरे या दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
मोनिकाच्या हत्येमुळे तिच्या पालकांवर मोठा आघात झाला आहे. आरोपींच्या दंडाची रक्कम मोनिकाच्या पालकांना देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मोनिका ही ११ मार्च २०११ रोजी महाविद्यालयात पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी भररस्त्यात तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी २५ दिवसांत मुख्य सूत्रधार जयस्वालसह सहाही आरोपींना अटक केली. आणखी एक आरोपी अद्याप फरारी आहे. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव गिरी यांनी तपास पूर्ण करून ९ जून २०११ रोजी ७५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले.