• मालेवाडा पोलिसांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह
  • जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

मालेवाडा पोलिसांनी एका गरीब आदिवासीला नक्षलवाद्यांचे कपडे चढवून, हाती बंदूक देऊन त्याचे छायाचित्र काढून बेदम मारहाण केल्यानंतर जिवंत मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या आदिवासीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केल्याने पोलिस दलाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यांतर्गत हरिलाल धुर्वे या गरीब आदिवासीचा शेती आणि किराणा दुकान हा मुख्य व्यवसाय आहे. २ मुले, १ मुलगी आणि पत्नी, अशा छोटय़ा कुटुंबाचा आनंदाने उदरनिर्वाह सुरू असतांनाच मालेवाडा पोलिसांच्या त्रासामुळे त्यांच्यावर संकट ओढवले आहे. तेथील पोलिस अधिकारी व कर्मचारी बळजबरीने नक्षलवादी ठरविण्याच्या मागे लागले आहेत, असा थेट आरोप मालेवाडा पोलिस दलावर धुर्वे यांनी केला आहे. यासंदर्भात धुर्वे याने जिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा पोलिस अधाक्षकांना लेखी तक्रार देऊन आपबिती कथन केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आठवडी बाजारासाठी मालेवाडा येथे रविवारला जावे लागते. २२ मे रोजी त्यानिमित्तानेच मालेवाडा येथे जाऊन सायकलने घरी येतांना सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी वारे व सहकाऱ्यांनी मला सरकारी दवाखान्याजवळ अडविले व काही एक कारण नसताना लाथाबुक्क्यांनी व काठीने रात्रीचे ९ वाजेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधून पोलिस मदत केंद्रात घेऊन गेले. तेथेही बेदम मारहाण करण्यात आली. काही वेळाने मी बेशुध्द झालो. त्यानंतर पोलिसांनी माझ्या अंगावरील कपडे काढून नक्षलवाद्यांचा पोषाख घातला. मी जेव्हा पहाटे शुध्दीवर आलो तेव्हा हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी माझ्याजवळ बंदूक देऊन छायाचित्रे काढली. माझ्या दुकानाबाबत विचारपूस करून तू तुझ्या दुकानातील साखरपत्ती नक्षलवाद्यांना नेऊन देतोस, तुझ्याजवळ ५ बंदुका आहेत, त्या तू कोठे लपवून ठेवल्या आहेस?, असे बोलून पुन्हा मारहाण केली. त्यानंतर सकाळी गावकरी मला सोडविण्यासाठी या पोलिस मदत केंद्रात आल्यावर केवळ तिघांनाच आत येऊ दिले, पण मला गावकऱ्यांसमोर येऊ दिले नाही. मला बाजूला नेऊन वारेसाहेबांनी धमकी दिली की, तुला आम्ही मारहाण केली, हे कोणालाही सांगायचे नाही. सर्वाना सांगायचे की, दारू पिऊन पडलो होतो. त्यामुळे मार लागला व पोलिसांनी मला उचलून पोलिस मदत केंद्रात आणले. जर तू कोणालाही आम्ही मारहाण केल्याचे सांगितलेस तर पुन्हा दोन-चारदा पोलिस ठाण्यात यावे लागेल, त्यावेळी आम्ही तुला जंगलात नेऊन मारून टाकू, अशी धमकी दिली.  पोलिसांच्या या धमकीने घाबरून मी कोणालाही काहीही सांगितले नाही किंवा पोलिसांविरोधात कोणतीही तक्रारही केली नाही. मला मारहाण करण्याच्या आठ दिवसाअगोदर आठवडी बाजारातून माझ्या गावचा गणेश मन्नू मदा यालाही बेदम मारहाण करण्यात आलेली होती. पोलिसांनी मला नक्षलवाद्यांचा पोषाख घालून माझी छायाचित्रे काढलेली आहे. त्यामुळे यापुढेही ते गैरफायदा घेऊन खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्याची दाट शक्यता आहे, तसेच माझ्या जिवितासही धोका आहे, असेही त्याने या तक्रारीत नमूद केले आहे. या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई व्हावी, अशीही मागणी त्याने तक्रारीत केली आहे.

तक्रार पाठवा, योग्य दखल घेऊ -नायक

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी नायक यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रार आपल्या पाहण्यात आलेली नाही, तुमच्याकडे आली असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून द्या, योग्य ती दखल घेऊ, असे ते म्हणाले.