दोन संशयित ताब्यात; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आरटीओ कॉर्नर भागातील कलानगर परिसरात शुक्रवारी रात्री टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत अखिल भारतीय सेनेचा शहराध्यक्ष व सराईत गुन्हेगार निखील मोरे उर्फ बाल्या याची हत्या केल्यामुळे शहरात टोळ्यांमधील युध्द अद्याप सुरूच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

दोन वर्षांपूर्वी त्याच भागात कुख्यात गुंड भगवान सानप याची हत्या झाली होती. ठक्कर बाजार परिसरात गुणाजी जाधव याची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणात अखिल भारतीय सेनेचा शहराध्यक्ष बाल्या उर्फ निखील मोरे हा संशयित आहे. या दोन्ही खुनाचा वचपा काढण्यासाठी टोळक्याने मयत गुणाजी जाधव याच्या वाढदिवसाची तारीख ठरवली. रात्री उशिरा कलानगर येथे ज्या भागात सानपची हत्या झाली, त्याच ठिकाणी बाल्या व त्याचे मित्र सुरज खोडे, अमोल निकम गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पाच ते सात जणांचे टोळके बाल्याचा दिशेने आले. त्यांनी त्या दोन्ही खुनांचा जाब विचारत हवेत दोन ते तीन गोळ्या झाडल्या.

या घटनेमुळे परिसरात धावपळ झाली. यावेळी संशयित जॉन काजळे, शरद पगारे, अमर गांगुर्डे, आरिफ कुरेशी, रोशन पगारे आणि अन्य तीन साथीदार यांनी कोयता व तलवारीने बाल्या व अन्य साथीदारांवर हल्ला चढविला. त्यात बाल्यासह, सुरेश व अमोल हे खाली कोसळले. हल्ल्यानंतर टोळक्याने घटनास्थळावरून पलायन केले. घाव वर्मी बसल्याने बाल्या जागीच गतप्राण झाला.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी पोलिसांनी संशयित आरिफ कुरेशीसह दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गुन्हेगारीचे प्रमाण चढेच

काही वर्षांपूर्वी टोळ्यांच्या कारवायांमुळे नाशिक शहराची प्रतिमा पूर्णपणे बदलली. टवाळखोरांचा धुमाकूळ, वाहनांची जाळपोळ या घटनाक्रमामुळे शहर अशांततेच्या गर्तेत ढकलले गेले. राजकीय वरदहस्त लाभलेल्या टोळ्यांमुळे गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी संबंधित टोळ्यांचे म्होरके व सदस्य तसेच त्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या घटकांवर कारवाईचे सत्र सुरू केले. मोक्कांतर्गत अनेक टोळ्यांवर कारवाई केली गेली. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण काहीअंशी कमी झाल्याचे दिसत असताना शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेतून टोळ्यांच्या कारवायांवर प्रकाश पडला.