पावसाळ्याचे दोन महिने संपत आले, तरी अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात खरीप पेरण्या होऊ शकल्या नाहीत, तर काही भागात पेरलेले वाया गेले. दुबार पेरणीची कोणतीच क्षमता शेतकऱ्यांमध्ये उरली नसून भर पावसाळ्यात दुष्काळी स्थिती जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आभाळ भरून येत असले, तरी थेंबही बरसला नाही. जिल्ह्यात मंगळवापर्यंत केवळ ८७.८३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस खूपच तोकडा आहे. मात्र, भरवशाच्या नक्षत्रांनीच दगा दिल्याने शेतकरीही पुरता हादरला आहे.
जिल्ह्यात मेअखेर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली, तेव्हा खरे तर विहिरींनी तळ गाठला होता. जलसाठेही आटले होते. विहीरीत पाणी जास्त नसले, तरी पावसाळ्यात पाऊस होईल या विश्वासाने शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात कापसाची लागवड केली. हा सर्व कापूस ठिबक सिंचनावर लावण्यात आला. आता पावसाने ताण दिल्याने व भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्याएवढा मोठा पाऊसही न झाल्याने विहिरींतील पाण्याचे झरे आटले, तसेच भर पावसाळ्यात विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात मेअखेर लागवड केलेल्या कापसाचे भवितव्य पूर्ण संपुष्टात आले आहे. प्रचंड खर्च करीत, वेगवेगळ्या ठिकाणांहून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी केलेली सर्व गुंतवणूक वाया गेली आहे. शेतकरी पुन्हा दुबार पेरणीसाठी हताश होऊन बसला आहे. दुबार पेरणीसाठी अवसान गोळा करायचे म्हटले तरी पावसाचाच पत्ता नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये सरासरीच्या निम्मा पाऊस होतो, तर कधी कधी ही सरासरी दोन-अडीच महिन्यांत पूर्ण होते. या वर्षी मात्र जिल्ह्यात या पावसाळ्यात केवळ ८७.८३ मिमी पावसाची नोंद झाली.
पूर्णा तालुक्यात सर्वात कमी ७६.४ मिमी, तर परभणी तालुक्यात ८९.३८ मिमी पाऊस झाला. पालम ७७, गंगाखेड ८८.२५, सोनपेठ १०७, सेलू ८९.१४, पाथरी ९१, जिंतूर ८८.५, मानवत ८४.३६ मिमी अशी पावसाची आकडेवारी आहे. एक तर पेरणीयोग्य पाऊस नाही व अनेक भागात अजून पेरण्यांनाच प्रारंभ नाही. गेल्या अनेक वर्षांत न दिसलेले चित्र या वेळी मात्र प्रकर्षांने दिसून आले आहे. एका अर्थाने शेतकरी पुन्हा दुष्काळाच्याच खाईत ढकलला जाण्याची चिन्हे आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली, त्यांचा कापूस सुकत चालला असून पिकांच्या बुडाशी पाणी घालून शेतकरी हा कापूस जगवला जात आहे. पुढील पावसाच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी ही लागवड केली; पण तीच आता संकटात सापडली आहे. दुसरीकडे ठिबकच्या माध्यमातून लावलेला कापूसही कोमेजत आहे. पाऊसच नसल्याने व जमिनीतील ओल आटल्याने संपूर्ण पेरणी वाया गेल्यात जमा आहे. मूग, उडीद, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांच्या हाती अडीच महिन्यांत येतात, पण या वेळी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना या पिकांची पेरणी करता आली नाही.
जिल्ह्याच्या काही भागात नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांनीही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. जे बियाणे चढय़ा दराने शेतकऱ्यांनी खरेदी केले, त्या बियाण्यानेच दगा दिल्याच्या तक्रारी शेतकरी करू लागले आहेत. सेलू तालुक्यातील काही गावांत अजित कंपनीच्या कपाशीचे वाण पूर्ण फसले, तर कापसाची झाडे लाल झाल्याने उपटून फेकून द्यावी लागली. निम्मा पावसाळा सरत आला, तरी पेरण्यांचाच पत्ता नाही किंवा झालेल्या पेरण्यांची कोणतीच शाश्वती नाही, अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील जलसाठय़ांमध्येही वाढ होण्याइतका पाऊस न झाल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्नही तीव्र होण्याची भीती आहे.