पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील जयराम नैताम (६५) हा जंगलात बांबू आणण्यासाठी गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केल्याने जयरामचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चिंतलधाबा येथील जयराम नैताम हा शुक्रवारी जंगलात बांबू आणण्यासाठी गेला होता. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, शनिवारी सकाळी वनाधिकारी व कुटुंबीय जयरामचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले असतांनाच एके ठिकाणी जयरामचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्याच्या अनेक जखमा व पंजाचे निशाण होते, त्यामुळे जयरामवर वाघाने हल्ला केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, पंचनामा केल्यानंतर जयरामचे कुटुंबाला वन विभागाने तातडीची आर्थिक मदत दिली. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या परिसरात वाघाची भीती कायम असल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली

२०० डुकर मारली
पोंभूणा तालुक्यात मोकाट रानडुकरांनी चांगलाच हैदोस घातला आहे. त्यांनी हजारो एकर शेती उद्ध्वस्त केल्यामुळे अशा डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पोंभूर्णावासियांनी वनमंत्र्यांकडे करून मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनाही निवेदन दिले होते. ही मागणी लक्षात घेऊन वन विभागाने खास शुटरला बोलावून २०० डुकरांना मारले. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी परिसरात आणखी डुकरे आहेत. त्यांनाही या परिसरातून हाकलून लावा किंवा ठार मारण्याचा तगादा गावकऱ्यांनी लावून धरला आहे.