चार वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा कसेबसे सावरत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा गारांच्या पावसाचा तडाखा बसला आहे. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात बुधवारी दुपारी वादळीवार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या गारांमुळे बहरात आलेली ज्वारी, गहू या पिकांसह द्राक्ष आणि आंबा फळ पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

मराठवाड्यातील ज्वारीचे कोठार असलेल्या परंडा व उस्मानाबाद तालुक्यात ज्वारीचा सर्वाधिक पेरा असून हे पीक आता नुकसानीच्या अडकित्त्यात सापडण्याची धास्ती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा, लासोना, समुद्रवाणी, घुगीसह परिसरात दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अर्धा तास गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रानावर काढून ठेवलेला गहू भिजू नये म्हणून ताडपत्रीच्या सहाय्याने झाकण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. गतवर्षी जनावरांना चारा आणि माणसांना खाण्यासाठी ज्वारी विकत घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली. सध्या बहुतांश ठिकाणी हरभरा व गव्हाची काढणी व राशीची कामे सुरू आहेत. सुरूवातीला पेरणी झालेल्या ज्वारीची सध्या काढणी सुरू आहे. उशीरा पेरा झालेल्या व सध्या बहरात असलेल्या ज्वारीच्या काढणीला आणखी आठवडाभराचा अवधी आहे. मंगळवारपासून आकाशात ढग दाटून येत असल्याने शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली होती. बुधवारी दुपारी अचानक गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे ही धास्ती खरी ठरली आहे. काढणीनंतर खळ्यावर असलेल्या ज्वारीला पावसाचा तडाखा बसल्यामुळे ज्वारी काळवंडून जाणार आहे. परिणामी यंदा चांगले उत्पन्न पदरात पडण्याची अपेक्षा असलेल्या शेतकर्‍याला या गारपिटीने पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खाईत लोटले आहे.

हवामान, कृषी विभागाची कोणतीही पूर्वसूचना नाही
तीन वर्षांपूर्वी सलग गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर हवामान खाते आणि कृषी विभागाला जाग आली. त्यानंतर काही दिवस शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे अथवा वृत्तपत्रांतून बदलत जाणार्‍या वातावरणाची माहिती दिली जात होती. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणात उकाडा असल्यामुळे अवकाळी पावसाची दाट शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात होती. मात्र जिल्हा प्रशासन, हवामान खाते अथवा कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना याबाबत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही. किमान दोन दिवस अगोदर सूचना मिळाली असती तर खळ्यावर पडलेली ज्वारी अवकाळी पावसामुळे काळवंडून गेली नसती, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

osmanabad-125

osmanabad-155