विठ्ठलाचे नित्योपचार पूर्ववत

आषाढी वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शेकडो तास अहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठूरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. विठूरायाला गरम पाणी व दह्यादूधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. प्रक्षाळ पूजेनंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.  प्रक्षाळ पूजेबरोबरच आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते.

आषाढी  यात्रेत  लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठूराया अहोरात्र उभा होता. आषाढी यात्रा सुरू झाल्यावर सलग १७ दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असल्याने विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार  बंद होते. ते आज पूर्ववत करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. यासाठी सोमवारी दुपापर्यंत दर्शनाला येणारे भाविक िलबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भावना असते. यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह  प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे. यानंतर देवाला सुंदर  पोशाख परिधान करण्यात आला. तसेच हिरे-माणकांच्या दागिन्यांनी सजविण्यात आले. मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, मोठा लफ्फा आणि मोत्याचे कंठे घालण्यात आले. कानाला हिरेजडित मत्स्य जोड अशा पोशाखात नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते. रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते.

रात्री देवाचा थकवा पूर्णपणे संपविण्यासाठी विविध आयुर्वेदिक पदार्थाचा काढा झोपण्यापूर्वी दिला जातो. या काढ्यामुळे देवाला पूर्ण विश्रांती मिळून चांगली झोप लागते असे मानतात. देवाला उत्साह वाटण्यासाठी संपूर्ण मंदिर गरम पाण्यानं स्वछ धुवून काढले जाते. पुण्यातील एक भक्त संपूर्ण विठ्ठल मंदिर, देवाचा गाभारा आणि शयनगृह अतिशय सुगंधी फुलांनी सजवितात. या सुगंधात देव इतक्या दिवसाचा थकवा पूर्णपणे विसरून पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी उभा राहतो. अर्थात, या परंपरा सर्वसामान्य माणसांप्रमाणे पाळल्या जात असल्या तरी हे सगळे विधी पार पडत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात आणि आलेला शिणवटा जाऊन पुन्हा चेहरा प्रसन्न दिसू लागतो, अशी यामागची भावना आहे.

आयुर्वेदातील काढय़ाचे महत्त्व

आयुर्वेदात काढ्याचे महत्त्व सांगितले आहे. प्रक्षाळ पूजेला देवाला काढा दिला जातो. त्या काढ्यासाठी तुळस, लवंग, ज्येष्ठमध, दालचिनी, दगडी फूल, जायफळ, वेलदोडा इत्यादी औषधी पदार्थ एकत्र केले जातात.  सर्व भरड चूर्ण आणतात. त्यामध्ये ४ भाग पाणी मिसळून अग्निसंस्कार केला जातों. त्याचा १ भाग पाणी शिल्लक राहतो तो काढा असतो. या काढय़ाचे सेवन केल्याने अंगातील वात दोष कमी होतो. उर्जा मिळते. तसेच या पूजेला देवाला िलबू साखर लावली जाते, यामुळे शरीरावरील किवा मूर्तीवरील मळ,चिकटपणा दूर होतो. हा काढा देवाला रात्री दिला जातो त्यामुळे या पूजेला जसे आध्यात्मिक महत्त्व आहे तसेच आयुर्वेदाचेही महत्त्व दिसून येत असल्याचे आयुर्वेदाचार्य वैद्य गणेश बेणारे यांनी सांगितले.