पंढरीची वारी सुरू झाल्यापासून रोजचा पायी प्रवास, टाळ-मृदंगांचा अखंड नाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष अन् अभंगाच्या सुरावटीत दंग होणारे मन.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालत असलेले लाखो वारकरी ज्या एका ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत, ती ओढ आता संपणार आहे.
चैतन्याचा हा भक्तिसोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वाटेवर चालून पाय कितीही थकले, तरी त्याची तमा नाही. कारण आता पंढरीनाथाच्या नगरीमध्ये पोहोचण्याचे अलौकिक समाधान मिळणार आहे. या समाधानाचे भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असले, तरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक रुखरुख आहे ती म्हणजे या वर्षीची ही वारी संपण्याची. मनाला अनोखे बळ व उत्साह देणारी ही सुखाची वारी कधी संपूच नये, अशीच भावना या शेवटच्या टप्प्यामध्ये वारकऱ्यांमध्ये असते.
विठ्ठलाच्या दर्शनाची लागे आस,
धावतच जाऊ, घेऊ पंढरी विसावा
सुखाची ही वारी संपणार आता,
लागे रुखरुख माझीया जीवा..
अशी भावना व्यक्त करीत वारकऱ्यांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास सुरू आहे. प्रत्येक वर्षी अनेक जण हीच भावना व्यक्त करतात. ‘‘माउली, आता घरी जाऊ वाटत न्हाय,’’ अशीच प्रतिक्रिया वाटेवर चालणाऱ्यांकडून ऐकू येते. पंढरीनाथाच्या नगरीत पोहोचण्याचा आनंद, तर दुसरीकडे मनाला लागलेली एक खंत, अशा अवस्थेत वारकरी असताना उत्साह वाढविणाऱ्या काही परंपरा व रिंगण सोहळे साजरे केले जातात. त्याचप्रमाणे वारीच्या वाटेवर प्रबोधनाबरोबरच हास्य फुलविणारी भारुडेही रंगतात. पंढरीनाथाची नगरी जवळ आल्यानंतर ‘धावा’ म्हणून एक परंपरा जोपासली जाते. पंढरीच्या वाटेवर असताना वारकऱ्यांना एका उंच ठिकाणावरून विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसला अन् आता पांडुरंग अगदी जवळ आल्याचे पाहून वारकरी त्याला भेटण्यासाठी पळू लागले, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तीच ही ‘धावा’ परंपरा. वेळापूरपासून जवळच असलेल्या धावाबाबी माउंट येथे माउलींच्या सोहळ्याचा ‘धावा’ होतो, तर तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ही परंपरा तोंडले-बोंडले येथे पार पाडली जाते. या धाव्याची अनेकांनी नुकतीच अनुभूती घेतली.
परंपरेचा भाग वगळून या धाव्याकडे पाहिले, तर उत्साह म्हणजे नेमके काय असते, याची प्रचिती त्यातून मिळते. सोळा-सतरा दिवस रोजचा पायी प्रवास करून आलेल्या एखाद्याला एक-दोन किलोमीटर पळायला सांगितले, तर काय अवस्था होईल, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण, सत्तर ते ऐंशी वर्षांची मंडळी या धाव्यामध्ये एखाद्या स्पर्धेत धावावे, त्याप्रमाणे धावतात. धाव्याचे ठिकाण येताच पालखी रथही वेगात पुढे जातो व त्याबरोबर वारकरीही धावू लागतात. धावताना त्यांच्या चेहऱ्यावर कष्ट नव्हे, तर आनंदाच्या सर्वोच्च पातळीच्या समाधानाचे भाव असतात.
पंढरपूरच्या आधीचा पालख्यांचा शेवटचा मुक्काम वाखरीत असतो. वाखरीत पोहोचण्यापूर्वी रिंगणाचा देखणा सोहळा रंगतो. माउली व तुकोबांसह राज्याच्या विविध भागातील संतांच्या पालख्या पंढरपुरात प्रवेश करण्यापूर्वी वाखरीच्या पालखीतळावर जमतात अन् तेथे जणू संतमेळाच भरतो. तेथे पंढरीचे वर्णन करणारे अभंग रंगतात. गुरुवारी हा संतांचा मेळा वाखरीतून पंढरीत दाखल होईल व दुसऱ्या दिवशी एकादशीला वारकऱ्यांची पंढरीला भेटण्याची तृष्णा व वारीही पूर्ण होईल.