उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होत असून, नाशिक मतदारसंघात आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ आणि सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार मतदारसंघाचे सलग नऊ वेळा प्रतिनिधित्व करणारे माणिकराव गावित या दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांसाठी एकूण ९७ उमेदवार रिंगणात असून त्यात अपक्षांची संख्या ४० आहे. या मतदारसंघातील १८६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निवडणूक यंत्रणेने जाहीर केले आहे. सुमारे एक कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात चित्तवेधक लढती होत असून, त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या निवडणुकीवर दिग्गजांची पुढील राजकीय वाटचाल अवलंबून आहे. एकेका जागेचे महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. नाशिक मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेस आघाडीतर्फे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात कडवी झुंज आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार आपले नशीब अजमावत असले तरी मुख्य लढत महायुतीचे हरिश्चंद्र चव्हाण आणि आघाडीच्या डॉ. भारती पवार यांच्यात होईल. विजयाची ‘हॅटट्रिक’ करण्याच्या तयारीत असलेल्या चव्हाणांसमोर डॉ. पवार यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. डाव्या आघाडीची या मतदारसंघात चांगली ताकद असून माकपचे हेमंत वाघेरे रिंगणात आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत आघाडीचे अमरिश पटेल आणि महायुतीचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या ठिकाणी महायुतीचे खा. ए. टी. पाटील आणि आघाडीचे सतीश पाटील यांच्यात लढत होईल. रावेर मतदारसंघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघातून त्यांची सून रक्षा खडसे महायुतीकडून, तर आघाडीतर्फे मनीष जैन, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार उल्हास पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. नंदुरबार मतदारसंघात आघाडीतर्फे माणिकराव गावित, तर महायुतीकडून डॉ. हीना गावित यांच्यात सरळ लढत होत आहे. काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात महायुती व डॉ. हीना यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेससमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.