भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांची ४० लाखांची रक्कम लुटल्याच्या तक्रारीनंतर एका महिलेने लोहिया यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला. त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ भाजपने शहरात बंद पुकारला. बीड तालुक्यातील पालवण येथे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू वाघमारे मारहाण प्रकरणी दलित संघटना पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या. त्यामुळे मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही पक्षांकडून ‘राडा’ सुरू झाला आहे.
विनयभंगाचा लोहिया यांच्या विरोधात नोंदविलेला गुन्हा चुकीच्या तक्रारीच्या आधारे असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारास  राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे पाठबळ आहे. त्यांनी  राजकीय दबाव टाकून गुन्हा दाखल करायला भाग पाडले असे सांगत, त्याच्या निषेधार्थ भाजपच्या आमदार पंकजा पालवे, फुलचंद कराड यांनी शुक्रवारी परळी शहर बंद पाळण्यात आला. भाजपने पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील काढला. या घटनेने मतदानानंतर शहरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला. राष्ट्रवादीनेही पत्रक काढून सुर्यभान मुंडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत निवडणुकीच्या काळात टेम्पोतून ४० लाख रुपयांची रक्कम कशी नेली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बीड शहरात राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू वाघमारे यांना मतदान केंद्रावर पक्षाची टोपी घातल्या कारणावरुन पोलीस निरीक्षक नाईकवाडे यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी कारवाई करावी, या मागणीसाठी सकाळी विविध दलित संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक घेतली. दुसरीकडे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पालवण या गावात मतदानाच्या दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांला मारहाण केल्याची घटना घडली होती. या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी सकाळी अकराच्या सुमारास मस्के हे गावात गेले असता त्यांच्यावर २० ते २५ जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मस्के यांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवला. या प्रकरणी आ. विनायक मेटे व कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.