शेतीमालाची निर्यात ४२ हजार डॉलरवरून ३२ हजार डॉलरवर आली असून, आयात माल १ लाख ४० हजार कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतीमालाला उठाव नाही आणि हे चित्र बदलण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन दिल्लीत १० लाख शेतकरी आंदोलन छेडणार आहेत. त्यावेळी राज्यकर्ता कितीही मोठा असू द्या, त्याला गुडघे टेकायला भाग पाडणारच असल्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

सातारा वाढे फाटा येथे ‘स्वाभिमानी’च्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शेट्टी यांनी यावेळी केंद्र, राज्य शासनाच्या धोरणांचा समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यकर्त्यांमुळे जय जवान, जय किसानची स्थिती मर जवान, मर किसान अशी झाली आहे. आता शेतकऱ्यांची मुलंबाळंही आत्महत्या करू लागली आहेत. शासनाच्या धोरणांचा हा परिणाम आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा ज्यांना फायदा झाला त्यांनी पुढे काहीच केले नाही. उलट त्यांनतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, हेच आम्हाला बक्षीस मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

देशातील मोजक्या कार्पोरेट कंपन्यांनी ९ लाख कोटींची कर्जे बुडवली, तर देशातील ७० कोटी शेतकऱ्यांवर साडेबारा लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, पण उद्योजकांसाठी शेतकऱ्यांना बाजूला ठेवले गेले. म्हणजे अच्छे दिन कोणाला आले असा सवाल शेट्टी यांनी केला.

आम्ही भीक मागत नाही तर सातबारा कोरा करा आणि पुन्हा कर्जबाजारीपणा नको यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा असा न्याय मागतो आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार आहे. आजवरचे संघर्ष आमने-सामने झाले होते. परंतु, आत्ताचा शत्रू विश्वासघातकीपणातून समोर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी-आडवी फूट नाहीच, पण संघटनेचा साधा टवकाही निघाला नसल्याचे खासदार शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निक्षून सांगितले. सचिन नलवडे यांची जिल्हाध्यक्षपदी घोषणा करून स्वाभिमानी आणखी भक्कम करण्याचा निर्धार शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर म्हणाले, शेतकरी कर्जमुक्तीसाठी खरा संघर्ष करणार असून राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष अर्जुन साळुंखे, नूतन जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.