शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांचा आदर्श

नगरसेवक किंवा नगरपिते म्हटले की आपल्यासमोर आलिशान गाडीत फिरणारा, हातात, गळ्यात सोन्याचे वजनदार दागिने मिरवणारा आणि ज्या त्या प्रभागात दरारा ठेवणारा वजनदार माणूस नजरेत येतो. परंतु या सगळ्यांना छेद देत चक्क नाला किंवा गटारीत उतरून सफाईचे काम करणारा एक नगरसेवक सोलापुरात आहे. गुरुशांत धुत्तरगावकर हे त्याचे नाव.

सोलापूर शहरात पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई सहसा होत नसल्याने थोडासा जरी पाऊस झाला, तरी येथील नाले भरभरून वाहतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पालिका प्रशासनाचा कारभार या प्रश्नावर नेहमीच उघडय़ावर पडतो. हे चित्र एकीकडे अनुभवास येत असताना दुसरीकडे मात्र एखादा नगरसेवक स्वत: नाल्यात किंवा चक्क गटारीत उतरून सफाई करतो हे मात्र अशक्यच. परंतु हे शक्य असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या कृतीतून दिसून येते.

अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय राहूनही नेहमीच सामाजिक कार्यात मग्न असलेले गुरुशांत धुत्तरगावकर हे विजापूर रोड भागातून गेल्या फेब्रुवारीत झालेल्या पालिका निवडणुकीत निवडून आले. नगरसेवक झाल्यानंतरही त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. स्वत:च्या वागणुकीत थोडासाही फरक पडू न देता धुत्तरगावकर हे स्वत: पडेल ती कामे करीत आहेत. प्रभागातील अस्वच्छ नाल्यांच्या सफाईचे काम होणे आवश्यक होते. त्यासाठी नगरसेवक म्हणून पालिका प्रशासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी सहजपणे ढकलता आली असती. परंतु धुत्तरगावकर यांनी पालिका प्रशासनावर विसंबून न राहता लोकसहभागातून नाले सफाईची मोहीम हाती घेतली. त्यासाठी त्यांनी स्वखर्चातून २० फावडे, कुदळ आणि टोपल्या घेतल्या आहेत. प्रत्येक बुधवारी सकाळी दोन तास नाले सफाई मोहीम राबविली जाते. या मोहिमेत धुत्तरगावकर यांनी, ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे पूर्ण दोन तास स्वत: काम केले.