रनप विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने बाजी मारत सर्व सहाही पदे काबीज केली. विशेष म्हणजे या वेळी भाजपचे आठ तर आघाडीचे तीन नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याने सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. भाजपला एकही पद मिळाले नाही. उलट या पक्षाकडे असलेली तीनही पदे शिवसेनेने काबीज केल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे, तर शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असले तरी आता या समितीतही सेनेचेच वर्चस्व राहणार असल्यामुळे भाजपची आणि पर्यायाने नगराध्यक्षांची कोंडी होण्याचीच दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरच शिवसेना-भाजप युती मोडीत काढण्यात आली. दरम्यान, राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. परंतु स्थानिक पातळीवर दुभंगलेली मने मात्र  एक झाली नाहीत. याची प्रचिती रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून आली आणि त्या दिवसापासूनच या दोन पक्षांमध्ये शह-काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली. गेल्या दोन सर्वसाधारण सभेत सेनेच्या काही नगरसेवकांनी काही ठरावांना विरोध करून भाजप नगराध्यक्ष मयेकर यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. या पाश्र्वभूमीवर आजच्या निवडणुकीत काय होणार, कोण बाजी मारणार याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते. परंतु सेनेचे सर्व सहाही सभापती निवडून येणार हे निश्चित दिसून आल्याने भाजपने या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली आणि निवडणुकीतील रंगतही संपुष्टात आली. त्यामुळे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले.
नूतन सभापती पुढीलप्रमाणे आहेत. शिवसेनेचे उपनगराध्यक्ष संजय ऊर्फ संजू साळवी (आरोग्य व स्वच्छता), योगेश ऊर्फ राहुल पंडित (बांधकाम), स्मितल पावस्कर (पाणी), रशिदा गोदड (महिला व बालकल्याण), शिल्पा सुर्वे (शिक्षण), प्रीती सुर्वे (नियोजन व विकास), तर मुनीज जमादार यांची महिला व बालकल्याणच्या उपसभापतिपदी निवड झाली आहे. नवनिर्वाचित सभापतींमध्ये आमदार उदय सामंत यांच्या समर्थक स्मितल पावसकर (पाणी सभापती), प्रीती सुर्वे (नियोजन व विकास सभापती), तसेच मुनीज जमादार (उपसभापती महिला व बालकल्याण) यांचा समावेश आहे. या वेळी पीठासन अधिकारी म्हणून रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. नूतन सभापतींचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, आ. उदय सामंत, आ. राजन साळवी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.