देशातील विविध राज्यांमधील पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्वप्न विकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जनतेने सपशेल नाकारल्याचे सिद्ध होते. सरकार चालविण्याची जबाबदारी त्यांना पार पाडता येत नाही, हेच त्यांच्या शंभर दिवसांच्या कारकीर्दीवरून दिसून आले. महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळे काही घडणार नाही. राज्यातील सुज्ञ जनता काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.
आश्वी (ता. संगमनेर) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विखे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी सरकारने नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला. कृषी व पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरीहिताचे निर्णय झाले. प्रयोगशील योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आलेल्या नव्या क्रांतीमुळे शेतकरीही विकासाच्या प्रवाहात सहभागी झाला. राज्याची प्रतिमा उंचावण्यात कृषी विभागाने मोठा हातभार लावला आहे.
लोकसभा निवडणुकीत केवळ खोटे स्वप्न दाखवून, भाजपच्या लोकांनी मतदारांची थट्टा केली. शंभर दिवसांत कामे तर झाली नाहीच, उलट निर्यातबंदी करून कांदा आणि डाळिंब उत्पादकांना अडचणीत आणले. ‘अच्छे दिन’वाल्यांना जनतेने पोटनिवडणुकीच्या माध्यमातून नाकारले असून महाराष्ट्रातदेखील महायुतीला कोणताही जनाधार मिळणार नाही. सर्वसामान्यांचा विचार काँग्रेसनेच केला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांना शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्राधान्य दिले गेले.
निमगावजाळी येथील गोरक्षवाडीत झालेल्या बैठकीत विखे यांनी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून या परिसरात पाणी देण्याचे काम झाले आहे. भविष्यात अवर्षणप्रवण योजनेच्या माध्यमातून पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करण्याची ग्वाही त्यांनी दिली.