सातत्याने सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या निषेधार्थ सोमवारी छोटय़ा विक्रेत्यांनी त्र्यंबक बंदची हाक देऊन नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला.
त्र्यंबकेश्वर हे निमशहरी असून येथे जिथे जागा मिळेल, तिथे छोटे विक्रेते व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करतात; परंतु कुंभमेळा सुरू होण्याआधीपासून अतिक्रमणाच्या नावाखाली पालिका कर्मचारी वस्तू व माल सातत्याने जप्त करत आहेत. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांची कुचंबणा झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली. या पाश्र्वभूमीवर, विक्रेत्यांनी त्र्यंबकेश्वर बंदची हाक देत नगरपालिकेवर मोर्चा काढला. कुशावर्त तीर्थावर एकत्रित जमून मोर्चेकरी मेनरोड, पोस्ट गल्ली, तेली गल्लीमार्गे डॉ. आंबेडकर चौकातून पालिका कार्यालयावर धडकले. स्थानिक विक्रेत्यांना नेहमीच्या जागेवर व्यवसाय करू द्यावा, अतिक्रमणाच्या नावाखाली वेठीस धरू नये, विक्रेत्यांना देशोधडीला लावू नये, व्यवसायासाठी रस्त्याच्या बाजूला जागा उपलब्धता करावी, यासह अधिकाराचा गैरवापर कोणी अधिकाऱ्याने करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या. कुंभमेळ्यात विक्रेत्यांना बेरोजगार करण्याचे काम पालिका व काही शासकीय अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोपही करण्यात आला. मोर्चात माजी आमदार शिवराम झोले, बाळासाहेब झोले यासह आदिवासी संघर्ष परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव व विक्रेते सहभागी झाले होते.