पेठ तालुक्यातील कायरे गावाजवळ बंधाऱ्याचे काम सुरू असताना वीज पडून दोन ठार तर १८ मजूर जखमी झाले. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वादळी वाऱ्याने सुरगाणा तालुक्यातील ५२ घरांचे नुकसान झाले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटात सापडलेल्या जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुरळक पावसाने हजेरी लावली. आदल्या दिवशी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह तसाच पाऊस झाला होता.
पेठ तालुक्यातील कायरे गावाजवळ बंधाऱ्याचे काम सुरू असताना सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मजुरांवर वीज कोसळली. त्यात कृष्णा सीताराम चौधरी (६०) आणि सलीक कृष्णा राथड (२५) हे जागीच ठार झाले. तसेच १८ जण जखमी झाले. मृत व जखमी मजूर हे पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जखमींमध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. सुरगाणा तालुक्यातील उदायुदरी गावाला वादळी वाऱ्याचा फटका बसला. गावातील ५२ घरांचे नुकसान झाले आहे.
उष्माघाताने १३ मोर दगावले
दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने नांदगाव तालुक्यात १३ मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती वनखात्याने शनिवारी दिली. या परिसरात सुमारे २०० मोर आहेत, मात्र वाढत्या तापमानाचा फटका त्यांना बसला आहे. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.