अलिबागजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला जखमी झाली आहे. या घटनेनंतर अलिबाग परिसरावर शोककळा पसरली आहे. कुरुळहून रेवसकडे जाणाऱ्या भरधाव  डंपरचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. डंपरने सुरवातीला स्कुटीला, त्यानंतर कारला आणि शेवटी अ‍ॅक्टिवाला धडक दिली. स्कुटीचालक सुचेता लक्ष्मण मोकल, राहणार हाशिवरे या जखमी झाल्या, तर अ‍ॅक्टिवा डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने रुषाली अरुणकुमार चव्हाण (वय ३५) आणि अरुणकुमार बजरंग चव्हाण (वय ४१) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.    या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालक सिद्धोधन एकनाथ वावले वय २४ याला अटक करण्यात आली आहे.