पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण केलेल्या आई व मुलाची बुधवारी रात्री पिंपरी व विरार पोलिसांनी एकत्रितरीत्या सुटका केली. पिंपरी परिसरात पैसे घेण्यासाठी बोलवून आरोपींनी अपहरणकर्त्यांच्या मित्राला बुधवारी दिवसभर फिरवत ठेवले. पोलिसांनी पाठलाग करून मोशी परिसरात चौघांना अटक केली आणि दोघा माय-लेकांची सुटका केली.
अमित मोतीलाल खोसा (वय ३६) आणि सरला मोतीलाल खोसा (वय ६४, रा. विराटनगर, विरार, ठाणे) अशी सुटका केलेल्या माय-लेकांची नावे आहेत. याप्रकरणी पद्माराम शांताराम पटेल (वय ३०, रा. मोशी), सतीश त्रिंबक भोसले (वय २५), दीपक बोथाराम चौधरी (वय २५, रा. दोघेही-लातूर) आणि लिंबाराम शांताराम चौधरी (रा. मुंबई)यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हा मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याचा व आरोपींचा रॉ-मटेरियल वरून वाद झाला होता. त्याच कारणावरून आरोपींनी पोलीस असल्याचे सांगत या दोघांना घरातून उचलून आणले होते. त्यांना पुण्यात पिंपरी-चिंचवड भागात ठेवले होते. या ठिकाणाहून त्यांनी खोसा यांच्या मित्राला फोन करून या दोघांच्या सुटकेसाठी पंचवीस लाखांची खंडणी मागितली होती.
 शेवटी मोशी येथे पैसे घेऊन बोलविल्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन विधाते आणि विरार पोलीस पथकाचे पी.एल रोकडे यांनी बुधवारी सापळा लावला व चौघांना अटक केली.