बिबटय़ाच्या तावडीतील शेतकऱ्यास पाळीव कुत्र्यांनी वाचवल्याच्या घटनेने जंगली श्वापदांच्या नागरी वस्तीतील घुसखोरीवर चिंता व्यक्त केली जात आहे. बिबटय़ाचे खाद्य शिकाऱ्यांनी हिरावून नेल्यानेच भुकेलेले बिबटे नागरिवस्त्यांकडे वळल्याचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून वारंवार स्पष्ट होत आहे. अनेकदा बिबटय़ाच्या कातडय़ांची तस्करीही पकडली जात आहे. बिबटय़ाच्या भक्ष्यांची मानवकडून झालेली बेसुमार शिकार, वणवे तसेच वृक्षतोडीमुळे बिबटय़ासह वन्यश्वापद दुर्मिळ होऊ लागली आहेत. या बाबी गांभीर्याने घेता वनखात्याच्या कारभारावर केवळ प्रश्न उपस्थित होत नाहीतर वनखाते वनरक्षक की वनभक्षक हा कळीचा प्रश्न होऊ पहात आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांलगतच्या नागरी वस्त्यांमध्ये अलिकडच्या काळात बिबटय़ांसह त्यांच्या पिलांचाही वावर वाढला असून, त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर हल्ले झाले आहेत. तर, ठरावीक एका डोंगर परिसरात बिबटय़ांची व जंगली श्वापदांची वनखात्याने नोंदवलेली आकडेवारी त्यांच्याकडूनच फेटाळण्याचा प्रकारही काही वेळा समोर आल्याने सह्याद्रीच्या डोंगररांगात कोणत्या परिसरात हे हिंस्र प्राणी आहेत, असतील तर त्यांचे प्रमाण किती, त्यांच्यापासून बचावाचे उपाय काय? याबाबत विशेषत: शेळय़ा व मेंढरे चरवण्यास डोंगरपठारावर भटकंती करणारा शेतकरी निश्चितच अनभिज्ञ आहे.
काल कराड तालुक्यातील बांदेकरवाडी-सवादे येथील शिंदेदऱ्या या डोंगरविभागातील प्रकारही शेतकऱ्यांच्या अज्ञानाचाच प्रकार होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबटय़ा व पाळीव कुत्र्यांमधील हल्ले-प्रतिहल्ले असा प्रकार अडीच तासांचा ‘लाइव्ह शो’ ठरून गेला. परिसरातील सुमारे तीनशे शेतकऱ्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून बिबटय़ाची जीव वाचवण्याची धडपड अगदी जवळून पाहण्याचे धाडस केल्यानेच बिबटय़ाने त्यातील महादेव बांदेकर या गुराख्या शेतकऱ्यावर झडप घालून भक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबटय़ाच्या हिंस्र प्रवृत्तीला पाळीव कुत्रीही भीत नसल्याचे समोर आले. पाळीव कुत्र्यांच्या कळपाने बिबटय़ालाच लक्ष्य करून, त्यावर जोरदार हल्ला चढवल्याने अतिउत्साही महादेव बांदेकर हे बचावले. मात्र, बिबटय़ाने जोरदार पंजा मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे पाळीव कुत्र्यांच्या कळपाने बिबटय़ाला वेगवेगळय़ा झाडांवर तब्बल अडीच तास खिळवून ठेवून त्यास जेरीस आणले. सुदैवाने आणखी अनर्थ न घडता बिबटय़ानेही कुत्र्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेऊन डोंगराकडे पळ काढण्यात जणू बाजीच मारली. या थरारक घटनेने गेल्या सव्वातीन वर्षांपूर्वी कराडच्या सिटीपोस्टाजवळ भर नागरीवस्तीत बिबटय़ाने सरप्राइज व्हिजिट देत दुपारच्या प्रहरी चांगलाच धुमाकूळ घातल्याची घटना चर्चेत आली. बिबटय़ाच्या या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. बिबटय़ाने हणमंत माने या बघ्यावर जीवघेणी झडप घातली असता, सुदैवाने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि सहायक पोलीस निरीक्षक विकास धस यांनी बाकाप्रसंग ओळखून बिबटय़ावर २ गोळय़ा झाडल्या. त्यात बिबटय़ा गतप्राण होऊन त्याच्या तावडीतील हणमंत माने यांची सुटका होऊन सुमारे २५ मिनिटांच्या  खळबळजनक थरारनाटय़ास पूर्णविराम मिळाला. ही घटनाही बिबटय़ाला डिवचल्यानेच घडल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, भुकेने व्याकूळ झालेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाचा तुपेवाडी (ता. पाटण) येथील शेतकरी चंद्रकांत तुपे यांच्या घरातच शिरकाव झाला. आणि  तुपे कुटुंबीयांची एकच तारांबळ उडाली. मोठय़ा धाडसाने घराच्या न्हाणीत आश्रय घेऊन राहिलेल्या या अशक्त बछडय़ास पकडण्यात यश आले. तर, शिद्रुकवाडी येथे भुकेने व्याकूळ बिबटय़ाचा बछडा मृतावस्थेत सापडल्याची घटना त्या वेळी ताजीच होती.
सह्याद्रीच्या डोंगरांकडेला नागरी वस्तीत घुसखोरी करणारे बिबटे मानवावर हल्ले करण्यासाठी नव्हेतर भुकेने व्याकूळ असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ भरकटत असल्याची वस्तुस्थिती आहे. या प्रकारांदरम्यान बिबटय़ाला डिवचणे, त्याला जवळून पाहण्याचा अतिउत्साह दाखवणे, अशा प्रकारांमुळेच बिबटय़ा हिंसक होऊन लोकांवर हल्ले करीत असल्याचे स्पष्ट आहे. यावर बिबटय़ाला नागरी वस्तीतून पिटाळण्यासाठीची योजना काय हे वनखात्याने जाहीर करावे, कोणत्याही परिस्थितीत जंगली श्वापदांना जाणीवपूर्वक डिवचू नये याबाबतचे आवाहन होणे गरजेचे असल्याचे म्हणावे लागले. शिकाऱ्यांना पायबंद आणि वनसंपदेचे संवर्धन, संगोपन याबाबत ठोस आराखडा व त्याची कृती हेच बिबटय़ा अथवा जंगली श्वापदांच्या नागरी वस्तीतील घुसखोरीवर तूर्तास तरी पर्याय असल्याचे वन अभ्यासकांचे म्हणणे आहे.