‘‘भाऊ! खेडय़ावर माझी तीन एकर कोरडवाहू जमीन होती. दुष्काळानं जमिनीतून काहीच उत्पन्न मिळू शकलं नाही. पदरी बायको आणि दोन मुलं. त्यांना गावी ठेवलं आणि कामाच्या शोधात इथवर आलो. पण भाऊ! तुमी पायताच? कमाई तर दूर ऱ्हायली. समदी गमाईच सुरू हाये. आता गावी जाऊन बायको-पोरांना तोंड कसं दाखवू?’’

जान्या मला भेटला. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर लख्ख उभा राहतो. तो होता मे महिन्याचा दिवस. संध्याकाळची वेळ, रणरणत्या उन्हाची आगपाखड थांबलेली होती. पण अद्यापही रस्ता उष्ण नि:श्वास टाकतच होता. वाऱ्याने संप पुकारलेला होता. झाडे या संपाला मूक संमती देत होती. दुपारच्या वेळची रोडावलेली रहदारी आता बाळसं धरू लागली होती.

उत्तान दृश्याच्या सिनेमाच्या पोस्टरखाली जान्या उभा होता. काळा, खेडवळ, मध्यम वयाचा जान्या, जवळजवळ अर्धा उघडा होता. त्याच्या डोक्यावर अध्र्याहूनही अधिक उघडय़ा नटीचं पोस्टर. सौंदर्याचं वर प्रदर्शन, तर खाली होतं केविलवाण्या कुरूपतेचं वेडंविद्र दर्शन. कदाचित या विसंगतीमुळेच माझं त्याच्याकडे लक्ष गेलं असावं. कसं कोण जाणे, त्याचंदेखील माझ्याकडे लक्ष गेलं. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘भाऊ! मी जानोजी. लोक मला जान्या म्हनत्यात. आता तुमीच सांगा. शेटजींकडं म्या दोन रोज काम केलं. आन् त्याले पैशे मांगाले तवा त्यो म्हनला. ‘ऐतवारी तुझे पैशे देईन.’ भाऊ! म्या खावं काय? आन् ऱ्हावं कसं?’’ त्याचं खपाटी गेलेलं पोट, निस्तेज चेहरा, डोळ्यातील केविलवाणे भाव पाहून मला कससंच झालं. मुख्य म्हणजे त्याला माझ्याविषयी विश्वास वाटत असावा. आशा वाटत असावी; त्यामुळेच त्यानं मला त्याच्या समस्येविषयी सांगितलं असलं पाहिजे, असं मला वाटलं. पण मी त्याबाबत काहीच करू शकत नव्हतो. खिशातून पन्नास रुपयांची नोट काढून मी त्याला दिली. कर्तव्यपूर्तीच्या समाधानात मी काढता पाय घेतला.

त्यानंतर एक दीड महिन्याचा कालावधी लोटला. पावसाळा तोंडावर आला होता. फिक्कट पांढुरक्या ढगांच्या भुरटय़ा टोळ्या, चोरासारख्या  गुपचूप आभाळात हिंडत होत्या. संध्याकाळ झाली होती. मी घराकडे निघालो. घराच्या अंगणात पाऊल टाकतो आणि बघतो तो काय? सौभाग्यवती कोणाशी तरी भांडत होती. भिकारीच दिसत होता तो. पाठमोरा होता, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. दुष्काळामुळे ठायी ठायी भिकाऱ्यांचं पेव फुटलं होतं. तेवढय़ात माझ्याकडे त्याचं लक्ष गेलं. तो म्हणाला, ‘‘भाऊ! मी भिकारी न्हायी. भेटलं ते काम करत असतो. दोन रोज झाले. काम न्हायी भेटलं. पानी पिऊन अन् फुटाणे खाऊन दोन रोज काढले. पन आता मात्र भूक सुधरू देत न्हायी. आखरी भीक मांगावीच लागली. लय वंगाळ वाटलं.’’ त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी त्याला ओळखलं. त्याचा अवतार मात्र आणखीनच खराब झाला होता. तब्येतही खंगलेली होती. मी पत्नीला सांगितलं ‘‘अगं! याला मी ओळखतो. हा भिकारी नाही. आधी याच्याकरिता घरातून खाण्याकरिता काहीतरी घेऊन ये.’’ पत्नीनं घरातून चटणी, भाकरी, लोणचं, कांदा आणला. त्याचे डोळे भरून आले. मी म्हणालो ‘‘बाबा रेऽऽ! आधी खाऊन घे. पोटभर जेवण कर.’’ जेवण झाल्यावर तो गटागट लोटाभर पाणी प्याला. आणि म्हणाला ‘‘भाऊ! तुमचे लयच उपकार झाले. काही करण्याजोगं आसलं, तर सांगा. फुकट खानं बरं न्हायी वाटत.’’ त्याला सांगण्याजोगं कामही नव्हतं मी तसं त्याला सांगितलं. त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि तो म्हणाला, ‘‘भाऊ! नाही कसं म्हणता?’’ त्यानं जवळच खुरपं घेतलं आणि बागेतलं तण काढून टाकलं. खुरप्यानं रोपांभोवतालची माती उकरली. आळी नीट केली. काम झाल्यावर हातपाय धुतले. तेवढय़ात पत्नीनं माझे मला नको असलेले, जुने कपडे आणले आणि ते त्याला दिले. कां कू करत त्यानं ते घेतले. मी त्याची चौकशी करू लागलो.

‘‘जान्या! तुला बायको, मुलं बाळं असतील ?’’

‘‘हायती, पण काय करनार?’’

‘‘अरेऽऽ! बाबा! सुख दु:खात बायकोची अन् मुलाबाळांची साथ असते.’’ मी नकळत त्याच्या मनाला खोलवर झालेल्या जखमेला धक्का लावला असावा. कारण त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. मनात दडवून ठेवलेलं दु:ख त्याच्या शब्दातून बोलकं होऊ लागलं. ‘‘भाऊ! खेडय़ावर माझी तीन एकर कोरडवाहू जमीन होती. स्वत:चा बैल बारदाना काहीच नव्हता. दुष्काळानं जमिनीतून काहीच उत्पन्न मिळू शकलं नाही. पदरी बायको आणि दोन मुलं. त्यांना गावी ठेवलं आणि कामाच्या शोधात इथवर आलो. म्हटलं काही कमाई करू आणि ती घेऊन गावी जाऊ. पण भाऊ! तुमी पायताच? कमाई तर दूर ऱ्हायली. समदी गमाईच सुरू हाये. आता गावी जाऊन बायको पोरांना तोंड कसं दाखवू? त्यांना खायला काय घालू?’’

हताश, निराश, खचलेला जान्या पाय ओढत निघाला. दिशाहीन मार्गानं..

.. नंतर पुन्हा कधीही दिसला नाही.

भालचंद्र देशपांडे