दूरदर्शन केंद्र, मुंबई यांच्या हस्ते दरवर्षी सह्य़ाद्री सिने अ‍ॅवॉर्ड्स सोहळ्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा सन्मान केला जातो. यंदा सोहळ्याच्या पाचव्या वर्षी या पुरस्कारात सामाजिक विषयावरील चित्रपटांनी बाजी मारली.
रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये २४ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर दिग्दर्शित पिता आणि लेक यांच्या नात्यांवर आधारित ‘अस्तु’ या चित्रपटाला मिळाला. तर नागनाथ मंजुळे यांना ‘फॅण्ड्री’साठी सवरेकृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर  ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ला सर्वोत्तम सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. समृद्धी पोरे यांना ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या सामाजिक चरित्रपटासाठी विशेष सन्मान पुरस्कार देण्यात आला. ‘यशवंतराव चव्हाण एक बखर’ या चित्रपटासाठी ‘अशोक लोखंडे’ यांना सर्वोत्तम अभिनेता आणि लीला गांधी यांना सर्वोत्तम नृत्य-दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला. ‘७२ मैल एक प्रवास’ या चित्रपटासाठी ‘स्मिता तांबे’ हिला सवरेकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर ‘यलो’साठी हृषीकेश जोशी यांना सवरेकृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार आणि मृणाल कुलकर्णीला ज्युरी पुरस्कार देण्यात आला. महेश कोठारे यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
यंदा पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षकांमध्ये संतोष मांजरेकर, रमेश साळगावकर, संतोष रणदिवे, मुकुंद मराठे, प्रकाश जाधव यांचा समावेश होता. तसेच प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जवाहर सरकार यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने कार्यक्रमाला हजेरी लावली.
अन्य पुरस्कार विजेते : नितीन दीक्षित (सर्वोत्तम कथा – अवताराची गोष्ट), नीतीश भारद्वाज/ प्रवीण तर्डे (सर्वोत्तम पटकथा – पितृॠण), संजीव कोलाटे (सर्वोत्तम संवाद – रंगकर्मी), अतुल लोहार (सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक – पिकुली), आदर्श शिंदे (सर्वोत्तम पाश्र्वगायक – दुनियादारी), वैशाली माडे (सर्वोत्तम पाश्र्वगायिका – वधी), शशांक पोवार (सर्वोत्तम पाश्र्वसंगीत – गुलाम बेगम बादशाह), ईश्वर बिद्री (सर्वोत्तम छायाचित्रकार – थोडं तुझं थोडं माझं), दीपक बिरकुड/ विलास रानडे (सर्वोत्तम संकलन – रणभूमी), रसुल पुक्कुटी/अमृत दत्ता (सर्वोत्तम ध्वनी – रेनी डे), श्रीया पिळगावकर (सर्वोत्तम पदापर्ण – एकुलती एक), मिहिरेश जोशी/यश कुलकर्णी (सर्वोत्तम बाल कलाकार- अवताराची गोष्ट), तेजश्री प्रधान (सर्वोत्तम सहकलाकार-स्त्री – लग्न पाहावे करून.)